Ratnagiri: रत्नागिरीतील अनधिकृत बांधकामांवर नगरपरिषदेचा हातोडा; भाजप शिष्टमंडळाने मुख्याधिकाऱ्यांचे केले अभिनंदन, उर्वरित बांधकामांवरही कारवाईची मागणी

रत्नागिरी: रत्नागिरी शहरात अनधिकृत बांधकामांविरोधात नगरपरिषदेने धडक कारवाई सुरू केली आहे. कोकणनगर आणि साळवी स्टॉप परिसरातील अतिक्रमणे तोडल्यानंतर, भारतीय जनता पार्टीच्या (भाजपा) रत्नागिरी शिष्टमंडळाने मुख्याधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या धाडसी भूमिकेचे अभिनंदन केले. तसेच, शहरातील इतर सर्व अनधिकृत बांधकामांवरही अशीच निःपक्षपातीपणे कारवाई करण्याची मागणी भाजपने केली आहे.

रत्नागिरी नगरपरिषदेकडून गेल्या काही दिवसांपासून शहरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत कोकणनगर परिसरातील काही बांधकामे तसेच साळवी स्टॉप येथील जलतरण तलावाजवळील काही अनधिकृत बांधकामे यशस्वीरित्या तोडण्यात आली. नगरपरिषदेच्या या कठोर आणि आवश्यक भूमिकेमुळे शहरात अतिक्रमण करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

याच पार्श्वभूमीवर, मुख्याधिकारी यांनी घेतलेली भूमिका आणि केलेल्या कारवाईचे कौतुक करण्यासाठी भाजपा जिल्हाध्यक्ष श्री. राजेश सावंत यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाने नगरपरिषदेत जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी शिष्टमंडळाने मुख्याधिकाऱ्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले व त्यांच्या कामाला पाठिंबा दर्शवला.

या भेटीदरम्यान भाजप पदाधिकाऱ्यांनी केवळ अभिनंदनावर न थांबता शहरातील अन्य भागांतील अनधिकृत बांधकामांचा मुद्दाही उपस्थित केला. शहरात कोठेही अनधिकृत बांधकाम असता कामा नये आणि त्यावर कोणताही दबाव न मानता, पक्षपात न करता कारवाई झालीच पाहिजे, ही भारतीय जनता पार्टीची स्पष्ट भूमिका असल्याचे शिष्टमंडळाने मुख्याधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले.

यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्यासह शहराध्यक्ष दादा ढेकणे, शहर सरचिटणीस निलेश आखाडे, महिला मोर्चा शहराध्यक्ष भक्ती दळी, ओबीसी महिला मोर्चा शहराध्यक्ष सोनाली केसरकर, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मंदार खंडकर, नितीन जाधव, राजेंद्र पटवर्धन, सचिन गांधी, राजू भाटलेकर, शैलेश बेर्डे, प्रज्ञा टाकळे, केतन कडू, संतोष सावंत आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:11 01-10-2025