मुंबई : राज्यातील व्यापार आणि अर्थव्यवस्थेला मोठी गती देणारा एक महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आता मद्य विक्री करणाऱ्या आस्थापना वगळता राज्यातील सर्व दुकाने, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि इतर व्यावसायिक आस्थापना 24 तास सुरू ठेवण्यास अधिकृत परवानगी देण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारच्या उद्योग विभागाने यासंबंधीचा शासन निर्णय जारी केला असून, यामुळे ‘नाईट इकॉनॉमी’च्या (Night Economy) संकल्पनेला मोठे बळ मिळणार आहे. या निर्णयाचे रत्नागिरी शहर व्यापारी महासंघासह राज्यभरातील व्यापारी संघटनांनी जोरदार स्वागत केले आहे.
काय आहे सरकारचा निर्णय?
‘महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियम) अधिनियम, 2017’ अंतर्गत राज्य सरकारने ही मोठी घोषणा केली आहे. या निर्णयानुसार, आता ग्राहकांना दिवसा आणि रात्री कधीही खरेदीची आणि सेवांची संधी उपलब्ध होणार आहे. यामुळे केवळ व्यापाऱ्यांच्या व्यवसायात वाढ होणार नाही, तर नागरिकांची सोय होऊन राज्याच्या आर्थिक चक्रालाही नवी दिशा मिळेल.
राज्यात 24 तास काय सुरू राहणार?
- सर्व प्रकारची दुकाने
- निवासी हॉटेल्स
- उपाहारगृहे (रेस्टॉरंट्स)
- खाद्यगृहे (इटरीज)
- थिएटर आणि सिनेमागृहे
- सार्वजनिक मनोरंजनाच्या आणि करमणुकीच्या इतर जागा
- इतर व्यावसायिक आस्थापना
या आस्थापनांना वेळेचे बंधन कायम
शासनाने स्पष्ट केले आहे की, काही आस्थापनांना या निर्णयातून वगळण्यात आले असून त्यांच्यावर वेळेचे निर्बंध पूर्वीप्रमाणेच लागू राहतील.
- मद्यपान गृहे (Permit Rooms)
- बार
- हुक्का पार्लर
- देशी दारूची दुकाने
कर्मचाऱ्यांचे हक्क अबाधित, साप्ताहिक सुट्टी बंधनकारक
आस्थापना 24 तास सुरू ठेवण्याची परवानगी देताना सरकारने कर्मचाऱ्यांच्या हक्कांचे संरक्षण केले आहे. अधिनियमातील कलम 16 (1) (ख) नुसार, आस्थापना आठवड्यातील सातही दिवस सुरू ठेवता येईल, मात्र प्रत्येक कर्मचाऱ्याला आठवड्यातून एकदा सलग 24 तासांची साप्ताहिक सुट्टी (Weekly Off) देणे मालकावर बंधनकारक असणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे शोषण होणार नाही, याची काळजी घेण्यात आली आहे.
स्थानिक प्रशासनाचा गोंधळ दूर
अनेक शहरांमध्ये मद्य विक्री न करणाऱ्या आस्थापनांनाही 24 तास सुरू ठेवण्यापासून स्थानिक प्रशासन आणि पोलीस यंत्रणा रोखत असल्याच्या तक्रारी शासनाकडे प्राप्त झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर, शासनाने आता स्पष्ट निर्देश जारी केले आहेत. त्यानुसार, केवळ मद्य विक्री आणि पुरवठा करणाऱ्या आस्थापनांनाच वेळेचे बंधन असेल. इतर सर्व आस्थापना कायद्यानुसार 24 तास सुरू ठेवता येतील आणि स्थानिक प्रशासनाने त्यांना अडवू नये, असेही या निर्णयातून स्पष्ट करण्यात आले आहे.
राज्याच्या अर्थव्यवस्थेला मिळणार चालना
या निर्णयामुळे राज्यातील रात्रीचे अर्थचक्र गतिमान होईल, अशी अपेक्षा आहे. हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि इतर सेवा रात्री उशिरापर्यंत सुरू राहिल्याने पर्यटनाला मोठी चालना मिळेल. त्याचबरोबर, दोन किंवा तीन शिफ्टमध्ये काम करण्याची संधी निर्माण झाल्याने रोजगारातही मोठी वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. व्यापारी संघटनांनी या निर्णयाचे स्वागत करत यातून राज्याच्या विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.













