उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीसांच्या पक्षाच्या बैठका सुरु, निवडणुकीनंतर हे एकत्र येतील : प्रकाश आंबेडकर

मुंबई : विधानसभा निवडणुका (Vidhansabha Election) झाल्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि भाजप (BJP) एकत्र येतील अशी भीती व्यक्त होत असल्याचे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केलं आहे.

उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पक्षाच्या बैठका चालल्या असल्याचा गौप्यस्फोट प्रकाश आंबडेकरांनी केला आहे.

निवडणुका झाल्यानंतर उद्धव ठाकरे आणि भाजपा ही एकत्रित येणार

उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये बैठका सुरु असल्याची माहिती प्रकाश आंबेडकरांनी दिली आहे. याविषयी बोलताना वंचित आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर म्हणाले की, निवडणुका झाल्यानंतर उद्धव ठाकरे आणि भाजपा ही एकत्रित येणार आहे, अशी भीती व्यक्त होत आहे. त्यामुळं बहुजन समाजाने आणि मुस्लिम समाजाने यांना बळी पडू नये आणि यांना मतदान करू नये. कारण येणाऱ्या दिवसात उद्धव ठाकरे हे भाजप बरोबर जातील असा गौप्यस्पोट त्यांनी गोंदियामध्ये केला आहे. तर उद्धव ठाकरेंसोबत असलेले राष्ट्रवादी व काँग्रेस यांना मुस्लिम समाज असं सांगत आहे की त्यांच्याकडून लिहून घ्या की ते पुढचे पाच वर्ष तुमच्या सोबत राहतील. आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी मुस्लिमांना कशा पद्धतीने आश्वासन देते हे पाहणं देखील महत्वाचं आहे.

भेट झाली नाही, ठाकरे गटाची माहिती

राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत असतानाच एक धक्कादायक बातमी समोर आली होती. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची चर्चा सोमवारी सकाळपासून राजकीय वर्तुळात रंगली होती. तसेच संजय राऊत यांनीही अमित शाह यांची भेट घेतल्याचे काँग्रेस पक्षातील उच्चपदस्थ सूत्रांकडून सांगितले जात होते. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवा भूकंप होणार का, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, या सगळ्यावर आता ठाकरे गटातील (Thackeray Camp) एका उच्चपदस्थ नेत्याने प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेस आणि ठाकरे गटात जागावाटपाच्या मुद्द्यावरुन वाद जरुर आहे. पण ठाकरे गट विधानसभा निवडणुकीत एकट्याने लढण्याचा कोणताही विचार करत नाही. अशा प्रकारची कोणताही भेट झाली नसल्याची माहिती ठाकरे गटाच्या वतीनं देण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:31 22-10-2024