रत्नागिरी : दसरोत्सवाला हिंदू धर्मात मोठे स्थान असल्यामुळे यादिवशी मोठ्या प्रमाणात नागरिक सोने-चांदी खरेदीला प्राधान्य देत असतात. हा मुहूर्त साधण्यासाठी येथील सराफ व्यावसायिक ही सज्ज झाले आहेत. दरम्यान, दसरा सणानिमित्त सोन्या-चांदीचे दर भडकले असून लाखांच्यावर दराने उच्चांक गाठला आहे. बुधवारी २४ कॅरेटचा भाव १ लाख १७ हजार ४०० रुपये, तर चांदी १ लाख ५२ हजार रुपये किलो जीएसटीसह असा दर आहे. सर्वसामान्यांच्या आवाक्याच्या बाहेर दर गेल्यामुळे वाढत्या दराचा धक्का बसला आहे. दसऱ्याच्या मुहूर्ताला शहरात ३५ कोटी, तर जिल्ह्यात अंदाजे १०० कोटींची उलाढाल होणार असल्याचे सांगण्यात आले.
साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेला दसरा सण आज गुरुवार, दि. २ ऑक्टोबर रोजी मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर कित्येक नागरीक सोने, चांदी, घर, वाहने खरेदी करीत असतात. दरम्यान, जागतिक घडामोडीमुळे गत काही महिन्यांपासून सोने-चांदीचे दर झपाट्याने वाढत आहे. याचा सामान्य ग्राहकांवर मोठा परिणाम झाला आहे. एकूण आर्थिक उलाढाल वाढत असली, तरी ग्राहकांची खरेदी क्षमता कमी होत आहे. यंदाही परिस्थिती तशीच झाली आहे. गतवर्षी सोन्याचा दर ७० ते ८० हजार होता; मात्र आता हाच दर १ लाख १७ हजार रुपये झाला आहे. मागील वर्षी चांदीही १ लाखाच्या आत होती, आता एक लाख ५० हजार रुपयापर्यंत दर गेला आहे.
त्यामुळे सर्वसामान्यांना खरेदीच्या उत्साहाला मुरड घालावी लागत आहे. दरम्यान, दरात वाढ होत असली, तरी जुने ग्राहक, मोठे व्यापारी सोने खरेदी करीत आहेत. शहरातील विविध दुकानांत सोने, चांदी खरेदीसाठी रत्नागिरीकर आता गर्दी करू लागले आहेत. सोन्या-चांदीचे किमती स्वस्त होतील, अशा आशेवर न बसता रत्नागिरीकरांनी सोने खरेदी करून घ्यावे, अन्यथा पुढील वर्षभरापर्यंत सोने दोन लाखांच्यावर जाण्याची जास्त शक्यता आहे.
रोखीने व्यवहाराची मर्यादा वाढवावी
सध्या सराफ व्यावसायिकांना २ लाख रुपये इतक्याच प्रमाणात रोखीने व्यवहार करण्याची मर्यादा आहे. मात्र सोने आणि चांदीचा दर वाढत असताना दोन लाख रुपये रोखीच्या व्यवहाराची मर्यादा रद्द करून किंवा चार लाख रुपये करावी, अशी मागणी व्यावसायिकांतून होत आहे.
दसऱ्यानिमित्त सोन्या-चांदीचे दर वाढलेलेच आहेत. दर कमी होणार नाहीत. लग्नसराई, विविध कार्यक्रम,सणासुदीच्याआधीच नागरिकांकडून सोने खरेदी करीत आहेत. जे नागरिक सोने स्वस्त होईल म्हणून थांबली आहेत. मात्र, सोने स्वस्त होणार नाही. असेच दर असतील, तर पुढील काही वर्षात सोने दोन लाखांच्यावर जाईल. शहरात ७० हून अधिक सोन्याची दुकाने असून अंदाजे ३५ कोटींची उलाढाल होण्याची शक्यता आहे. तर जिल्ह्यात अंदाजे १०० कोटींची उलाढाल होईल-अमेय वीरकर, अध्यक्ष, सराफ बाजार, अमेय ज्वेलर्स, रत्नागिरी
दसऱ्यानिमित्त सोने-चांदी खरेदीसाठी नागरिकांचा यंदाही कल चांगला आहे. दरही मुंबईप्रमाणे ठेवले आहेत. लेबर चार्जिसही कमी केले आहेत. सणासुदीत यंदाही सोने खरेदीसाठी ग्राहकांचा उत्साह असून जो विश्वास आहे, तो अद्याप कायम आहे. –प्रमोद खेडेकर, प्रमोद ज्वेलर्स, रत्नागिरी
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:54 AM 02/Oct/2025









