Ratnagiri : जिल्ह्यात झेंडू खरेदीसाठी झुंबड !

रत्नागिरी : शारदीय नवरात्रौत्सवाचा समारोप आज गुरुवारी होणार आहे. दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी शहरासह जिल्ह्यातील बाजारपेठेत झेंडू फुलांची मोठी आवक झाली आहे. मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रातील पावसामुळे बाजारात ओली फुले दाखल होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. तर सुख्या फुलांना मोठी मागणी वाढली आहे. झेंडूची फुले खरेदी करण्यासाठी नागरिकांची झुंबड पहावयास मिळत आहे. बुधवारी बाजारात एक किलो ओल्या झेंडूला ४० ते ५०, तसेच चांगल्या प्रतीच्या सुक्या झेंडूला १०० ते १२० रुपये दर असून रत्नागिरीकर मोठ्या प्रमाणात खरेदी करीत आहेत. एरव्ही झेंडूचे भाव २०० ते २५० पर्यंत जातात; मात्र यंदाही भाव स्थिर असल्याचे दिसून आले.

श्रावण, गणेशोत्सव त्यानंतर आता दसरा, दिवाळीला झेंडूसह विविध फुलांना मोठी मागणी असते. रत्नागिरीत जास्तीत जास्त फुले कोल्हापूर, सोलापूर, साताऱ्यासह विविध भागांतून येत असतात. दसरा सणात झेंडूला मोठी मागणी असते आणि चांगला दरही मिळतो. दरम्यान, घाट परिसर, मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे कित्येक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे फुलांच्या दरात तेजी येण्याची शक्यता आहे.

रत्नागिरी शहरातील बाजारपेठेत, बसस्थानक, रेल्वेस्थानक, माळ नाका, मारुती मंदिर, साळवी स्टॉप, कुवारबाव, कारवांचीवाडी यासह विविध ठिकाणी झेंडूची मोठी आवक आली आहे. तसेच विविध ठिकाणी रस्त्याच्या कडेला कित्येक किरकोळ व्यापारी झेंडू विक्री करीत आहेत. रत्नागिरीकर खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करीत आहेत. दरम्यान, आज गुरुवारी झेंडूची आवक कमी झाल्यास झेंडूच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे.

अशा आहेत किमती
सुका झेंडू – १०० ते १२०
ओला झेंडू- ४० ते ५०
गुलछडी-५०० ते ७००
शेवंती – १०० ते २५० रुपये
तयार झेंडूचे हार- लहान ५० मोठे हार- १५० ते ९०० रुपयांपर्यंत

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:07 AM 02/Oct/2025