रत्नागिरी : कोकणातील तिलोरी कुणबी आणि ओबीसी समाजाचा हैदराबाद गॅझेटीअरसंदर्भात जो गैरसमज होता, त्याबाबत या समाजाच्या प्रमुख नेत्यांशी आज चर्चा झालो, ओबीसी समाजाच्या आरक्षणाला यामुळे कसलाही धक्का लागणार नाही, असा विश्वास उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी दिला.
ओबीसी, कुणबी समाजाच्या शंकांचे शासनस्तरावर पूर्ण समाधान व्हावे, यासाठी लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक लावली जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित ओबीसी आणि तिलोरी कुणबी समाजाच्या प्रमुख नेत्याशी मराठा आरक्षणासंदर्भात काढण्यात आलेल्या हैदराबाद गॅझेटीअरसंदर्भात झालेल्या बैठकीनंतर ते पत्रकार परिषदेत
बोलत होते.
सामंत म्हणाले, ओबीसी आणि तिलोरी कुणबी समाजाच्या नेत्यांशी सुमारे दीड तास चर्चा झाली. ९ ऑक्टोबरला मराठा आरक्षणाविरुद्ध या समाजाचे मुंबईत आंदोलन आहे. या पार्श्वभूमीवर या समाजाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा झाली. हैदराबाद गॅझेटीअर हे त्या भागापुरते मर्यादित आहे. त्याचा कोकणाशी काही संबंध नाही. यामुळे ओबीसी आणि तिलोरी कुणबी समाजाच्या आरक्षणाला कोणताही धक्का लागणार नाही किंवा ते कमी होणार नाही, तसा शब्द मी तुम्हाला देतो. हैदराबाद गॅझेटीअरसंदर्भात जिल्ह्यात एकही दाखला सापडलेला नाही. जिल्ह्यात आतापर्यंत ३६३ कुणबी-मराठा नोंदी सापडल्या आहेत. परंतु त्यापैकी आतापर्यंत फक्त १५ दाखले मिळाले आहेत.
पूरग्रस्तांच्या घराला मदतीचे तोरण बांधणार
दसरा मेळावा हा शिवसेनेची परंपरा आहे. एकनाथ शिंदे यांनी पक्षाच्या विविध पदाधिकाऱ्यांना जबाबदारी दिली असून पूरग्रस्त जिल्ह्यामध्ये जाऊन मदत करून त्यांच्या घराला तोरण बांधून दसरा साजरा करण्यासाठी आम्ही सर्व जाणार आहोत, असे उदय सामंत यांनी सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:44 AM 02/Oct/2025









