Chiplun : रिक्टोली येथे एसटी-दुचाकी धडकेत एक ठार तर एकजण गंभीर

चिपळूण : तालुक्यातील दसपटी विभागातील चिपळूण-तिवरे मार्गावरील रिक्टोली येथील अवघड उतारावरील वळणावर एसटी बस आणि दुचाकीची धडक होऊन तिवरेतील एक जण ठार, तर एक जण गंभीर जखमी झाला असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना बुधवारी (ता. १) सकाळी पावणेआठच्या सुमारास घडली. जयवंत बाबाजी शिंदे (वय ५७, रा. तिवरे) असे मृत झालेल्याचे नाव आहे. गणेश पांडुरंग शिंदे गंभीर जखमी झाले आहेत.

गणेश शिंदे आणि जयवंत शिंदे दोघेही खडपोली औद्योगिक वसाहतीमध्ये सुरक्षारक्षक म्हणून कामाला होते. मंगळवारी रात्रपाळीचे काम संपल्यानंतर दोघेही दुचाकीवरून तिवरे गावी येथे निघाले होते. गणेश शिंदे दुचाकी चालवत होते. तिवरे मार्गावरील रिक्टोली येथील एका वळणावर तिवरे-पुणे एसटी बस व या दुचाकीची धडक झाली. त्यामध्ये जयवंत शिंदे ठार, तर गणेश शिंदे जखमी झाले आहेत. एसटी बस चालक राहुल संदीपान कोरडे (वय ३५) तिवरेहून पुण्याला बस घेऊन निघाले होते.

अपघाताची माहिती मिळताच रिक्टोली, तिवरे, कादवड परिसरातील लोकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. शिरगाव पोलिस देखील घटनास्थळी पोहोचले होते. बुधवारी सकाळी पावणेआठच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे दसपटी विभागात शोककळा पसरली. जयवंत शिंदे यांच्या मागे पत्नी, मुलगा, भाऊ असा परिवार आहे. या प्रकरणी अलोरे शिरगाव पोलिस ठाण्याचे भरत पाटील तपास करत आहेत.

झाडींमुळे अपघाताच्या घटना
खडपोली ते तिवरे मार्गावरील रस्त्याच्या दुतर्फा असलेली झाडी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. काही ठिकाणच्या वळणावर समोरून येणारी वाहने दिसत नाहीत. परिणामी अपघात होत आहेत. रस्त्याकडेला वाढलेल्या झुडपांची साफसफाई करावी, अशी मागणीही केली जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:56 AM 02/Oct/2025