Mukhyamantri Samruddha Panchayatraj Abhiyan : ग्रामीण भागातील पाणंद रस्त्यांना मिळणार कायदेशीर संरक्षण

मंडणगड : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत ग्रामीण भागातील रस्ते समस्येवर उपाय शोधण्यासाठी तालुक्यात पाणंद रस्ते अभियान राबवले जात आहे. यामधून पाणंद रस्त्यांचे नकाशे अद्ययावत करण्यात येत आहेत. प्रशासनासह ग्रामस्थांनाही ते अधिक सुलभआणि लाभदायी ठरणार आहे.

मुख्य रस्ते आणि हद्दीचे रस्ते, पाखाडी, शेतावर जाणाऱ्या पायी मार्गांना कायदेशीर संरक्षण मिळणार असल्याने शेतकऱ्यांना शेतात ये-जा करण्यास अडथळा होणार नाही, या अनुषंगाने मंडणगड तहसील कार्यालय आणि भूमी अभिलेख कार्यालयाच्या माध्यमातून तालुक्यातील केरीळ, नारगोली, पाट आणि अडखळवण या गावांमधील पाणंद रस्त्यांची मोजणी प्रक्रिया झाली. या मोजणी मोहिमेत भूमी अभिलेख कार्यालय, मंडणगडचे शिरस्तेदार दिलीप बोटे, निमतानदार योगिता डांगे, भूकरमापक तन्वी मद्ये आणि अभिलेखपाल अभिषेक जंगापले यांनी सहभाग घेतला.

या प्रक्रियेत ग्रामस्थांच्या उपस्थितीत पाणंद रस्त्यांचे नकाशे अद्ययावत करण्यात आले, अतिक्रमणांची तपासणी करून ती हटविण्याची कार्यवाही करण्यात आली, तसेच रस्त्यांना विशिष्ट क्रमांक देण्याचे काम हाती घेण्यात आले. तहसीलदार अक्षय दास यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या अभियानाचा उद्देश महताजे ग्रामीण भागातील मुख्य रस्ते, हदीचे रस्ते, पाखाडी व शेतावर जाणारे पायी मार्ग यांची शाश्वत नोंद करुन त्यांना कायदेशीर संरक्षण देणे होय. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतात ये-जा करण्यास अडथळा येणार नाही आणि भविष्यातील पिढ्यासाठीही हे रस्ते सुरक्षित राहतील.

सेवा पंधरवडा’च्या पहिल्या टप्प्यात राबवण्यात आलेल्या या उपक्रमामुळे गावकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे. ग्रामीण विकासासाठी प्रशासनाने हाती घेतलेली ही मोहीम ‘समृद्ध पंचायत अभियाना’च्या उदिद्ष्टष्टपूर्तीकडे एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे मत ग्रामस्थांकडून व्यक्त हेच आहे.

पाणंद मोहिमेंतर्गत पायवाटा, शेतमार्ग यांचे रुंदीकरण झाल्यास त्याचा फायदा शेतीक्षेत्र वाढण्यासाठी होईल. याचा उपयोग शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी होणे अपेक्षित आहे. मोजणी प्रक्रिया झाली असली, तरी या मार्गावरील संबंधित शेतकऱ्यांच्या संमती मिळणे आवश्यक आहे. दूरदृष्टीचा विचार करून यांची अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामपंचायत, शेतकरी आणि प्रशासन यांनी सकारात्मक राहिले पाहिजे. – संतोष दिवेकर, सदस्य ग्रामपंचायत

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:17 PM 02/Oct/2025