विद्यार्थ्यांनी सात्विक आहाराकडे वळावे : कीर्तनकार सचिन साठे

माखजन : सशक्त भारताचे स्वप्न साकार करायचं असेल, तर आजच्या विद्यार्थ्यांनी सात्विक आहाराकडे वळावे, असे मत कीर्तनकार सचिनबुवा साठे यांनी व्यक्त केले. माखजन जिल्हा परिषदेच्या आदर्श मराठी शाळेत शारदोत्सवात आयोजित शारदीय कीर्तन कार्यक्रमात ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, आज विद्यार्थी जंक फूडच्या आहारी गेला आहे. यामुळे विद्यार्थ्यांना आरोग्याविषयी सतत समस्या उद्भवत आहेत, याकडे पालकांनी लक्ष देण्याची गरज आहे. भारतीय संस्कृतीमध्ये आहाराविषयी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. काय खावं, केव्हा खावं, कितीवेळा खावं हे सांगितलेले आहे. आयुर्वेदातदेखील हेच पाहायला मिळतं. पण आज विद्यार्थी नेमकं उलट करताना दिसत आहेत.

कीर्तनाच्या मध्यंतरात विद्यालयातील कस्तुरी जगन्नाथ जड्यार हिने ‘माय भवानी तुझे लेकरू’ हे गीत सादर केले. शारदोत्सवानिमित्त विविध गटांत भोंडला स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये लहान गटात प्रथम कस्तुरी जड्यार, द्वितीय सक्षम चाळके, तृतीय ऋषभ सागवेकर, मध्यम गटात प्रथम आर्या जोगले, द्वितीय श्रावणी खोपे, तृतीय आरोही हेमण, मोठ्या गटात प्रथम आरोही कांबळे,
द्वितीय साक्षी पाटील, तृतीय आदित्य मोरे यांनी क्रमांक मिळवले. भोंडला स्पर्धेचे परीक्षण विनया पेंडसे यांनी केले. यावेळी मुख्याध्यापिका सौ. नांदिवडेकर, शिक्षक श्री. घाणेकर, मितेश पळे, सुप्रिया जाधव, व्यवस्थापन अध्यक्षा शामल सागवेकर आदी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:27 PM 02/Oct/2025