Ratnagiri : पटवर्धन हायस्कूलमध्ये महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी

रत्नागिरी : शहरातील पटवर्धन हायस्कूल येथे आज (२ ऑक्टोबर) राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व शालेय कर्मचारी यांनी सहभाग घेत या दिवसाचे औचित्य साधले.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. यावेळी मुख्याध्यापिका श्रीमती जानकी घाटविलकर, उपमुख्याध्यापक रूपेश पंगेरकर, पर्यवेक्षिका श्रीमती शिरोळकर, अमर लवंदे व गुरुकुल प्रबंधक श्रीमती नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयेश गुरव यांनी केले. प्रस्तावना उपमुख्याध्यापक श्री. पंगेरकर यांनी सादर केली. त्यानंतर मुख्याध्यापिका श्रीमती घाटविलकर यांनी मनोगत व्यक्त करताना गांधीजी व शास्त्रीजींच्या कार्यातून शिक्षक व कर्मचारी यांनी प्रेरणा घेऊन स्वच्छता, शिस्त व शांततेच्या मूल्यांचे आचरण करावे, असे प्रतिपादन केले.

या प्रसंगी गांधीजींनी दिलेल्या “स्वच्छतेचा महामंत्र”, “जगावर पगडा असलेली व्यक्ती”, “जागतिक शांततेसाठी गांधींचे प्रयत्न” तसेच “ईश्वर अल्ला तेरो नाम” या विचारांवर शिक्षक कृती कार्यातून वंदन करू” असे मुख्याध्यापिका श्रीमती घाटविलकर यांनी मार्गदर्शन केले. यानंतर मुख्याध्यापिका श्रीमती घाटविलकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थित सर्वांनी स्वच्छतेची प्रतिज्ञा घेतली. पर्यवेक्षक अमर लवंदे यांनी आभार प्रदर्शन केले.

पटवर्धन हायस्कूल तसेच आर्ट्स कॉमर्स सायन्स ज्युनिअर कॉलेज रत्नागिरीचे सर्व शिक्षकेतर कर्मचारी उत्तम फलक लेखन करणारे श्री. धामापूर यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली. या कार्यक्रमाचे नियोजन श्री. राठोड, जयेश गुरव व श्री. भोये यांनी केले. कार्यक्रमानंतर गटनिहाय शालेय परिसराची स्वच्छता करण्यात आली. गांधी-जयंती व शास्त्री-जयंतीचे औचित्य साधून विद्यालयाने स्वच्छता, शांती व प्रेरणादायी कार्याचा संदेश सर्वापर्यंत पोहोचवला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:34 PM 02/Oct/2025