देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील साडवली येथील इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी महाविद्यालय आणि संगमेश्वर तालुका केमिस्ट आणि ड्रगिस्ट असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने औषध निर्मिती आणि औषधांविषयी रुग्णांना माहिती होण्यासाठी जनजागृती रॅली काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृती केली. यावेळी नव्याने स्थापन केलेल्या मॉडेल फार्मसीचे उद्घाटन करण्यात आले.
४००हून अधिक फार्मासिस्ट आणि विद्यार्थ्यांनी ‘औषध निर्माणशास्त्राचे महत्त्व’ आणि रुग्णांना औषधांविषयी योग्य मार्गदर्शन यांसारखे संदेश देणारे फलक घेऊन रॅली काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि शासकीय ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरात पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप माने यांनी फार्मासिस्टच्या योगदानाचे कौतुक केले.
महाविद्यालयात स्थापन करण्यात आलेल्या मॉडेल फार्मसीचे उद्घाटन संस्थेच्या कार्याध्यक्षा नेहा माने यांच्या हस्ते झाले. प्राचार्य डॉ. अमोल खाडे यांनी मॉडेल फार्मसीच्या स्थापनेमागील उद्देश स्पष्ट केला. यावेळी महाविद्यालयातील शिक्षक, विद्यार्थी आणि रुग्णालयातील कर्मचारी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:10 PM 02/Oct/2025














