देवरूख : शहरातील श्री हनुमान प्रासादिक बालमित्र समाज खालची आळी मंडळाची शांततेची दिंडी रविवारी रात्री ग्रामदेवता सोळजाई मातेकडे नेण्यात आली. या दिंडीतील अशोक वनातील श्री हनुमंताची सीतामाईंची झालेली भेट असा जिवंत देखावा साकारण्यात आला. या दिंडीमध्ये सहभागी झालेली वानरसेना विशेष आकर्षण ठरली.
या दिंडीत रावणाने पळवून नेलेल्या सीतेला शोधण्यासाठी आलेल्या हनुमंतांनी अशोक वनात सीतामाईंची घेतलेली भेट असा पौराणिक देखावा साकारण्यात आला. या देखाव्यात सीतामाई, हनुमान व दोन राक्षसिणी दाखवण्यात आल्या. दिंडीच्या पुढील बाजूस ताशेवाजंत्रीबरोबरच मृदंगाच्या तालावर भजन करत मंडळामधील महिला व पुरुषांनी नाचाचा ठेका धरला होता. दिंडीमध्ये हनुमान व तब्बल ११ वानर दाखवले होते.
ही दिंडी रिक्षा स्टैंड, एसटी स्टैंड, माणिक चौक, दत्त मंदिर मार्गे सोळजाई मंदिराकडे नेण्यात आली. मंदिराच्या सीमेजवळ सोळजाईचे मानकरी व गुरव यांनी वाजंत्रीसह आरती घेऊन या दिंडीला भेट दिली. मानाचे श्रीफळ आदलाबदली करून एकत्रित ही दिंडी मंदिरापर्यंत गेली. आरती म्हणून मंदिराला प्रदक्षिणा करत सोळजाई मातेचे दर्शन घेऊन देवीला शांततेचे गाऱ्हाणे घालत दिंडीची सांगता झाली.
अध्यक्ष श्रीकांत साळसकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही दिंडी काढण्यात आली. दिंडी मार्गावर वानर सेनेने घातलेला उच्छाद सर्वच नागरिकांना भावला. शेकडो वर्षांची परंपरा जपत या मंडळाने जिवंत देखावे दिंडीद्वारे नेण्याची परंपरा कायम ठेवली आहे.
या दिंडीमध्ये हनुमानाच्या भूमिकेत ओंकार पवार, प्रतीक वनकर, राक्षसीण म्हणून दिलीप वनकर, महेश पवार, सीता सुयशा मुळ्ये व वानर म्हणून दिलीप करंडे, गौरेश घडशी, तृशार घडशी, श्रवण नलावडे, सार्थक नलावडे, वरद पावसकर, स्वरूप नलावडे, शिवम नलावडे, अर्णव सनगले, रुद्र वनकर, पवन करंडे यांनी भूमिका बजावल्या.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:38 PM 02/Oct/2025














