संगमेश्वर : कोकण दीपकाडी किंवा एकदांडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फुलांच्या जतनासाठी प्रयत्न करणाऱ्या देवरुख येथील संशोधकांना मोठे यश मिळालं असून, त्यांनी दीपकाडीच्या बियांची यशस्वी उगवण केली आहे. कोकण दीपकाडी या संकटग्रस्त वनस्पतीच्या संवर्धनाला या संशोधनाने चालना मिळाली आहे. या वनस्पतीच्या बिया रुजवणे आणि त्यापासून नवीन रोपे तयार करून त्याला फुले येणे हे आव्हानात्मक समजले जाते.
देवरूख येथील सह्याद्री संकल्प सोसायटीचे अध्यक्ष शार्दूल केळकर, कार्यकारी संचालक प्रतीक मोरे आणि आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. प्रताप नाईकवाडे, प्रकल्प सहाय्यक विराज आठल्ये, अतीश माईनकर, महेंद्र चव्हाण हे मागील काही वर्षांपासून या वनस्पतीच्या संवर्धनसाठी काम करत आहेत. त्यांच्या प्रयोगांना आता यश मिळाले असून त्यांनी नियंत्रित परिस्थितीत दीपकाडीच्या बियांची यशस्वी उगवण केली आहे. महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ संचलीत महाराष्ट्र जनुक कोशाच्या मदतीने हा प्रकल्प कार्यान्वित झाला असून या हंगामात त्यांनी दीपकाडीची शेकडो नवीन रोपे तयार केली असून ती पुन्हा जवळच्या खडकाळ पठारावर पुनररोपित केली आहेत. त्यामुळे ही प्रजाती नैसर्गिक अधिवासात परत स्थिरावण्याची शक्यता वाढली आहे.
संवर्धनासाठी प्रयत्न आवाश्यक
देवरूखजवळील साडवलीचे कातळसडेही असेच जैवविविधतेने नटलेले आहेत. त्यावर अनेक वनस्पती आढळतात, त्यातच दीपकाडी एक दुर्मिळ अशी वनस्पती वाढते, दीपकाडीला पांढऱ्या रंगाची सुंदर नाजूक फुले येतात. तिचे शास्त्रीय नाव दीपकाडी कोकनेन्स असून काही काळापूर्वी ती वन्यस्थितीत नामशेष झाली असावी असे मानले जात होते. ही वनस्पती विशिष्ट प्रकारच्या मातीत आणि
हवामानात येत असल्याने तिचा नैसर्गिक अधिवास हा मर्यादित आहे. तिची संख्या कमी होत असल्याने आययूसीएन या जागतिक संस्थेने तिची नोंद गंभीरपणे संकटग्रस्त अशी केली आहे. वेळीच तिच्या संवर्धनासाठी प्रयत्न केले नाहीत तर ती नष्ट होण्याची भीती व्यक्त केली जाते.
आम्ही तयार केलेली रोपे नैसर्गिक अधिवासात लावली आहेत. स्थानिक लोक तिचा वापर गजरे, हार करण्यासाठी तसेच शोभेसाठी करतात. दीपकाडीच्या संवर्धनात स्थानिक लोकांचा सहभाग आवश्यक आहे. भविष्यात अधिक प्रमाणात बीजअंकुरण, रोपवाटिका उभारणी तसेच नैसर्गिक अधिवासात तिचे रोपण केले जाणार आहे- प्रतीक मोरे, सृष्टीज्ञान संस्था, देवरुख
कोकण दीपकाडी ही प्रदेशनिष्ठ वनस्पती असून तिचा नैसर्गिक अधिवास संकटात आहे. दीपकाडीसारख्या प्रजाती जपणे म्हणजे कोकणचा नैसर्गिक वारसा जपणे होय. या दुर्मीळ प्रजातीचे अस्तित्व टिकवणे ही आपली जबाबदारी आहे. या संशोधनामुळे तिच्या संवर्धनासाठी मोलाची मदत होणार आहे-डॉ. प्रताप नाईकवाडे, संशोधक, देवरुख
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:21 PM 02/Oct/2025














