देवरुख आगारातील एसटी फेऱ्यांचे नियोजन कोलमडले

साडवली : देवरुख आगारातून गावोगावी एसटीच्या फेऱ्या नियमित सुरू असतात. मध्यंतरी विविध कार्यक्रमांसाठी एसटी बसचा वापर केल्यामुळे एसटीच्या फेऱ्यांचे नियोजन कोलमडले होते. त्यानंतर ते पुर्वपदावर आले होते; परंतु एसटीचा कारभार मागील काही दिवसांपासून पुन्हा विस्कळीत झाला आहे. त्याचा फटका शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना बसला आहे.

देवरुख आगारातून एसटी फेऱ्यांचे नियोजन सुरळीत व्हावे यासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य रोहन बने यांच्यासह ठाकरे शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेतलेली होती. त्यानंतर काही काळ नियोजन व्यवस्थित होते. सध्या शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांच्या सहामाई परीक्षा सुरू आहेत. ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी परीक्षेसाठी देवरूखमध्ये येतात. एसटीच्या फेऱ्या कधी रद्द तर कधी खूप उशिराने सुटत असल्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थी वेळेत शिक्षण संकुलात पोहोचावे याकरिता एसटीच्या फेऱ्या सुरू केल्या; परंतु याच फेऱ्या रद्द करण्यात येतात. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, याची खबरदारी घेत ज्या-ज्या मार्गावर शाळा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी एसटीच्या फेऱ्या सुरू आहेत. त्या वेळेवर आणि नियमित सोडण्यात याव्यात विद्यार्थी आणि पालकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. देवरुख बस स्थानकातून लांब पल्ल्याच्या बसेस अद्यापही वेळेत सुटत नसल्याच्या तक्रारी प्रवाशी वर्गाकडून करण्यात येत आहेत. याबाबत आता विभाग नियंत्रकानेच लक्ष घालावे, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.

विद्यार्थ्यांची गैरसोय दूर करण्यासाठी एसटी महामंडळाने योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. परीक्षा कालावधी असल्यामुळे विद्यार्थ्यांना वेळेत शाळेत जावे लागते. हे प्रशासनाने लक्षात घ्यावे. रोहन बने, देवरुख

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:04 PM 22/Oct/2024