चिपळूण मध्यवर्ती बसस्थानकाच्या बांधकामाला पुन्हा ब्रेक

चिपळूण : हायटेकच्या धर्तीवर बांधण्यात येत असलेल्या मध्यवर्ती बसस्थानकाचे बांधकाम कित्येक वर्षानंतर पहिल्या मजल्याच्या स्लॅबचे बांधकाम पूर्ण झाले आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून उर्वरित बांधकामाला सुरुवात झालेली नाही. दुर्लक्षामुळे बांधकामाच्या ठिकाणी झाडीझुडपांनी वेढा घातला असून मोकाट श्वानासह जनावरानांही रखडलेल्या बसस्थानकाची इमारत आश्रयस्थान बनले आहे. याबाबत प्रवाशांतून तीव्र संताप व्यक्त होत असून रखडलेल्या बसस्थानकाविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे. जीर्ण असलेल्या मध्यवर्ती बसस्थानकानकाची इमारत तोडून त्या जागी नव्याने सोयी सुविधांयुक्त हायटेकच्या धर्तीवर बसस्थानक बांधण्यास काही वर्षांपूर्वी प्रारंभ झाला. तत्कालीन ठेकेदार व एसटी महामंडळ यांच्या कुचकामी भूमिकेमुळे या बसस्थानकाच्या बांधकामाचा सुरुवातीपासून बट्ट्याबोळ झाला आहे.

परिणामी, कित्येक वर्षे होऊनही बसस्थानकाचे बांधकाम रखडलेल्या स्थितीत होते. असे असताना हे बसस्थानक पूर्णत्वास जावे, यासाठी राजकीय पक्षाच्या स्थानिक नेतेमंडळींनी आगार प्रशासनावर निवेदनाचा वर्षाव सुरू केला होता. यातूनच महामंडळास जाग आल्यानंतर रखडलेले बसस्थानकाचे बांधकास सुरू करण्यासाठी पूर्वीच्या ठेकेदाराचा ठेका काढून त्या जागी नव्या ठेकेदाराची नियुक्ती करण्यात आली. या ठेकेदाराने रखडलेल्या बांधकामासाठी गती घेतल्यानंतर कित्येक वर्षानंतर इमारतीचा पाया पूर्णत्वास गेला. इमारतीचे पिलर उभारल्यानंतर पहिल्या मजल्याचा स्लॅबचे कामही पूर्ण झाले आहे. एकूणच हे काम लक्षात घेता बसस्थानकाचे काम पूर्णत्वास जाईल, अशीच अपेक्षा होती, मात्र, पहिल्या स्लॅबच्या कामानंतर कित्येक दिवस होवून उर्वरित बांधकाम रखडते आहे. बांधकामाठिकाणी कामगारही दिसेनासे झाले आहेत. दुर्लक्षाअभावी बांधकामाला झाडीझुडपाने वेढा घातला आहे. याशिवाय मोकाट श्वानासह जनावरानांही रखडलेल्या बसस्थानकाच्या इमारतीत आसरा होत घेत असून अनेकांनी ऊन, पावसापासून दुचाकीचे संरक्षण व्हावे, यासाठी त्या ठिकाणी पार्किंग सुरू केले आहे. या अर्धवट बांधकामाविषयी प्रवांशातून तीव्र संताप व्यक्त होत असून बसस्थानक बांधकामाला कधी गती मिळणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

चिपळूण आगारातील बसस्थानकाचे काम गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे. याबांधकामात कधीही सातत्य राहिलेले नाही. बसस्थानकाचे काम मार्गी लागण्यासाठी आपण आंदोलनाची भूमिका घेतली. त्यानुसार काम सुरू झाले आणि पुन्हा ते रेंगाळले आहे. संबंधित अधिकारी आणि एसटी प्रशासनातील अधिकाऱ्यांनाही रखडलेल्या कामाचे काही सोयरसुतक नसल्याचे दिसते. प्रवाशांना त्याचा नाहक त्रास सोसावा लागत आहे.-संदीप सावंत, माजी तालुकाप्रमुख, ठाकरे शिवसेना

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:17 PM 22/Oct/2024