Neena Kulkarni : मराठी रंगभूमीवरील मानाचा समजला जाणारा नाट्य क्षेत्रातील यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जेष्ठ अभिनेत्री नीना कुळकर्णी यांना जाहीर झाला आहे. मराठी चित्रपट, दूरदर्शन, नाट्य क्षेत्रातील ज्येष्ठ अभिनेत्री, नाट्य प्रशिक्षिका अशा अनेक क्षेत्रात नीना कुळकर्णी यांचे उल्लेखनीय कार्य आहे.
यंदा दिले जाणारे हे 58 वे विष्णुदास भावे गौरव पदक आहे. 5 नोव्हेंबर रोजी रंगभूमीदिनाचे औचित्य साधून यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे. गौरवपदक, रोख रक्कम रु. 25,000 हजार स्मृतीचिन्ह, शाल आणि श्रीफळ असे गौरवपदकाचे स्वरूप आहे.
नीना कुळकर्णी यांचा परिचय
नीना कुळकर्णी या एक नावाजलेल्या भारतीय अभिनेत्री, लेखिका, निर्माती आणि दिग्दर्शिका आहेत. मराठी, हिंदी आणि इंग्रजी रंगभूमी, चित्रपट, दूरदर्शन तसेच आंतरराष्ट्रीय चित्रपट सृष्टीत त्यांनी आपले बहुपरिमित आणि समृद्ध योगदान दिले आहे. 1655 साली डॉक्टरांच्या कुटुंबात जन्मलेल्या नीना यांचे बालपण मुंबईत गेले. त्यांनी कॅनोसा कॉन्व्हेंट हायस्कूलमधून शिक्षण घेतले आणि पुढे एल्फिन्स्टन कॉलेजमधून फ्रेंच भाषेत पदवी घेतली. त्यांचा कलात्मक प्रवास 1970 च्या दशकाच्या सुरुवातीला मॉडेलिंगपासून सुरु झाला. त्या भारतीय प्रिंट मीडियातील पहिल्या “क्लिअरासिल गर्ल” म्हणून ओळखल्या जातात. मॉडेलिंगनंतर त्यांनी रंगभूमीवर प्रवेश केला. त्यांनी रंगभूमीवरील सहकलाकार आणि दिग्दर्शक दिलीप कुळकर्णी यांच्याशी विवाह केला होता. 2002 साली त्यांच्या पतीचे निधन झाले. त्यांना दोन अपत्ये असून, ती दोघेही अभिनय आणि निर्मितीच्या क्षेत्रात कार्यरत आहेत आणि अनेकदा नीना यांच्यासोबत सहकार्य करतात.
नीना कुळकर्णी यांच्या अभिनय प्रवासाची सुरुवात व्यावसायिक मराठी नाटक “गुंतता हृदय हे” मधून झाली. पं. सत्यदेव दुबे यांच्यासारख्या महान रंगकर्मीच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी “आधे अधूरे”, “मायावी सरोवर”, “अबे बेवकूफ”, “आह”, आणि “एज्युकेटिंग रीटा” यांसारख्या हिंदी प्रयोगशील नाटकांत अभिनय केला. ह्याच काळात त्यांची ओळख दिलीप कुळकर्णी यांच्याशी झाली. १९७८ मध्ये डॉ. विजया मेहता यांनी त्यांना मराठी नाटक “हमीदाबाईची कोठी” मध्ये शब्बोची भूमिका दिली, आणि त्यानंतर त्यांनी व्यावसायिक मराठी रंगभूमीशी एक दीर्घकालीन आणि समृद्ध नातं निर्माण केलं. त्यांनी “महासागर”, “सावित्री”, “आकस्मात”, “ध्येयनी मनी”, “सर्वस्वी तुझीच”, “वटवट सावित्री”, “आईचं घर उन्हाचं”, “देहभान”, “प्रेमपत्र”, आणि “असेन मी नसें मी यांसारख्या नाटकांत उल्लेखनीय भूमिका केल्या.
दिग्दर्शक म्हणूनही त्यांनी “महासागर” ची पुनर्निर्मिती केली तसेच “डॉक्टर तुम्ही सुद्धा आणि त्याची हिंदी आवृत्ती “डॉक्टर आप भी” यासारखी नाटके दिग्दर्शित केलीत. दिलीप कुळकर्णी दिग्दर्शित “नागमंडल”, “मातीच्या गाड्याचं प्रकरण”, आणि “अखेरचे पर्व” यांसारख्या अर्धप्रयोगात्मक नाटकांमधील त्यांचे अभिनयही खूप गाजले. इंग्रजी रंगभूमीवर त्यांनी “एज्युकेटिंग रीटा”, “महात्मा व्हर्सेस गांधी”, आणि “वेडिंग अल्बम” यांसारख्या नाटकांत भूमिका साकारल्या. सध्या त्या संगीतिक नाटक “गौहर” मध्ये मालका जान आणि वृद्ध गौहर जान या दुहेरी भूमिका साकारत असून, प्रेक्षकांकडून त्यांना मोठा प्रतिसाद मिळतो आहे.
मराठी चित्रपटसृष्टीतील त्यांच्या अभिनयाला खूप गौरव मिळाला आहे. “सवत माझी मुलगी” या चित्रपटासाठी त्यांना महाराष्ट्र राज्य पुरस्काराने गौरवण्यात आले, तसेच “सारीवर सारी” मधील भूमिकेसाठी त्यांना उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीर पुरस्कार मिळाला. महेश मांजरेकर दिग्दर्शित “आई” या चित्रपटातील त्यांच्या प्रमुख् भूमिकेला समीक्षकांकडून खूप स्तुती मिळाली आणि हा चित्रपट यशस्वीही ठरला. 2005-06 साली त्यांनी “शेवरी” या चित्रपटाची निर्मिती केली आणि अभिनयही केला. हा चित्रपट विद्या बर्वे या घटस्फोटित स्त्रीच्या जीवनातील संघर्षांची भावस्पर्शी कथा सांगतो. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार आणि पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव यामध्ये पुरस्कार मिळाले. त्यांना बायोस्कोप आणि मोगरा फुलला यासाठी फिल्मफेअर मराठी पुरस्कार मिळाले, तर “फोटो प्रेम” साठी समीक्षकांचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कारही प्राप्त झाला. हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांनी “दयारा”, “दागः द फायर”, “पुरुष”, “नायक”, “गुरु”, “पहेली”, “हंगामा”, “रंग”, “भूतनाथ”, “फिर भी दिल है हिंदुस्तानी”, “इंटरर्र”, “मेरे यार की शादी है”, “हसी तो फसी”, आणि “घायलः वन्स अगेन यांसारख्या चित्रपटांत विविध भूमिका साकारल्या.
दूरदर्शनवर त्यांनी “ये है मोहब्बतें” या स्टार प्लसवरील सात वर्षे चाललेल्या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारली होती. मराठी मालिकांमध्ये त्यांनी “स्वराज्य जननी जिजामाता” मध्ये जिजामाता आणि सध्या ‘येडं लागलं प्रेमाचं” मध्ये “जिजी” या भूमिकेसाठी प्रसिद्ध आहेत. “चाल नावाची वाचाळ वस्ती”, “साळसूद”, “नायक”, “अंक अजूबे”, आणि “अडोस पडोस” या दूरदर्शनवरील जुन्या मालिकांमधूनही त्यांचे योगदान उल्लेखनीय राहिले आहे.
OTT प्लॅटफॉर्मवर त्यांनी “ब्रीद”, “कडली”, “माँ”, आणि “देवी” या लघुपटांमधून प्रभावी भूमिका केल्या. Netflix वरील “The Royals” मध्येही त्यांनी भूमिका केली. आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांनी “द बेस्ट एक्झॉटिक मॅरीगोल्ड होटेल”, फ्रेंच भाषेतील मालिका “Rani”, आणि फ्रेंच चित्रपट “Noces” (2017) मध्ये अभिनय केला आहे.
अभिनयापलीकडे नीना एक प्रतिभावंत लेखिका देखील आहेत. त्यांच्या “अंतरंग” या लोकप्रिय मराठी स्तंभाचे लेख लोकसत्ता मध्ये प्रसिद्ध झाले होते, ज्याचे पुस्तक रुपांतर सध्या चौथ्या आवृत्तीत आहे. त्यांच्या अलीकडील चित्रपटांत त्यांनी हटके पण मनाला भिडणाऱ्या भूमिका केल्या आहेत जसे की “कुळकर्णी चौकात देशपांडे”, “पाँडिचेरी”, आणि “मिडियम स्पायसी”, “फोटोप्रेम” मधील मुख्य भूमिका ही IFFI व PIFF मध्ये भारतीय पॅनोरामासाठी निवडली गेली होती.
त्यांच्या सर्वात जास्त प्रिय भूमिकांमध्ये “उत्तरायण”, “संगीत मानापमान, हि चित्रपट “द सिग्नेचर”, “शास्त्री विरुद्ध शास्त्री”, तसेच OTT मालिका “Unpaused”, “Breathe”, आणि ब्रिटीश सिरीज “The Good Karma Hospital (Season 3) यांचा समावेश होतो.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:26 03-10-2025














