UBT, Bal Mane: रत्नागिरीतील खड्ड्यांवरून शिवसेना (उबाठा) आक्रमक; बाळ मानेंचा उद्या ‘चक्का जाम’चा इशारा

रत्नागिरी, दि. ३ ऑक्टोबर : शहरासह संपूर्ण जिल्ह्यातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली असून, या खड्डेमय रस्त्यांमुळे नागरिक आणि वाहनचालक त्रस्त झाले आहेत. याच मुद्द्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते आणि माजी आमदार बाळ माने यांनी आज पत्रकार परिषद घेत प्रशासनावर आणि थेट पालकमंत्री उदय सामंत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. या दयनीय परिस्थितीचा निषेध करण्यासाठी उद्या, दिनांक ४ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता रत्नागिरीत ‘चक्का जाम’ आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

“राज्यकर्तेच ठेकेदार, हे दुष्टचक्र थांबवा”
बाळ माने यांनी रस्त्यांच्या निकृष्ट कामांमागे सत्ताधारी आणि ठेकेदार यांचे साटेलोटे असल्याचा गंभीर आरोप केला. ते म्हणाले, “रत्नागिरीत गेल्या २० वर्षांपासून एक दुष्टचक्र सुरू आहे. जे राज्यकर्ते आहेत, तेच ठेकेदार आहेत. आर. डी. सामंत अँड कंपनी, ज्यांचे सुपुत्र राज्याचे उद्योगमंत्री आणि दुसरे सुपुत्र आमदार आहेत, त्यांच्याकडून अनेक कामे झाली आहेत. भ्रष्ट मार्गाने ठेकेदारीतून पैसे कमवायचे आणि तेच पैसे निवडणुकीत खर्च करून पुन्हा निवडून यायचे, हा प्रकार दुर्दैवाने सुरू आहे.”

या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याची मागणी करत, गेल्या पाच वर्षांत झालेल्या सिमेंट रस्त्यांची आणि त्यांच्या ठेकेदारांची श्वेतपत्रिका नगरपालिकेने जाहीर करावी, असे आव्हानही त्यांनी दिले.

DLP कालावधीतही दुरुस्ती का नाही?
रस्त्यांच्या नियमांवर बोट ठेवत माने यांनी प्रशासनाला धारेवर धरले. “मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील रस्त्यांसाठी ५ वर्षांची, तर इतर रस्त्यांसाठी २ वर्षांची डिफेक्ट लायॅबिलिटी पिरीयड (DLP) असते. याचा अर्थ, या कालावधीत रस्ता खराब झाल्यास तो ठेकेदाराने स्वखर्चाने दुरुस्त करून देणे बंधनकारक आहे. मात्र, रत्नागिरीत या नियमांचे सर्रास उल्लंघन होत आहे. प्रशासन या ठेकेदारांकडून काम का करून घेत नाही?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

सर्वसामान्यांचे हाल, प्रशासन जबाबदार
खराब रस्त्यांमुळे सर्वसामान्य जनता कशी भरडली जात आहे, हे सांगताना माने म्हणाले, “दुचाकी, रिक्षा, एसटी बस आणि ट्रक अशा सर्वच वाहनांचे प्रचंड नुकसान होत आहे. अनेकांना मणक्याचे आजार जडत आहेत, अपघात होऊन लोक मृत्युमुखी पडत आहेत. नुकतेच हातखंबा येथे एका विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू झाला. याला जबाबदार कोण? गणपती विसर्जन आणि नवरात्रीतही लोकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागला. या सर्वांची नैतिक जबाबदारी पालकमंत्री उदय सामंत यांचीच आहे.”

उद्या दुपारी १२ वाजता वाहनचालकांना आंदोलनाचे आवाहन
प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी उद्या, शनिवार, दिनांक ४ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता अभिनव आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे. बाळ माने यांनी जिल्ह्यातील सर्व वाहनचालकांना आवाहन केले आहे की, “आपण जिथे असाल, तिथे आपली दुचाकी, रिक्षा किंवा चारचाकी गाडी रस्त्यावर थांबवून केवळ १० ते १५ मिनिटांसाठी ‘चक्का जाम’ करा. हा विरोध दर्शवण्यासाठी आहे, जनतेला वेठीस धरण्यासाठी नाही. या आंदोलनातून आपण सर्व मिळून प्रशासनाला जागे करू.”

या आंदोलनासंदर्भात आजच जिल्हाधिकारी, मुख्याधिकारी आणि बांधकाम विभागाला निवेदन देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. आता या ‘चक्का जाम’ आंदोलनाला नागरिक कसा प्रतिसाद देतात आणि प्रशासन यावर काय कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:02 03-10-2025