◼️ आमदार किरण सामंत यांच्या हस्ते विशेषांकाचे प्रकाशन; संघर्षाच्या ठिणगीतून वटवृक्ष झालेल्या प्रवासाला उजाळा.
रत्नागिरी, दि. ३ ऑक्टोबर:
ज्या काळात सोशल मीडियाला पत्रकारितेत दुय्यम स्थान होते, त्या काळात कोकणात डिजिटल क्रांतीची मशाल पेटवणाऱ्या आणि आज कोकणातील सर्वात मोठे सुपरफास्ट न्यूज नेटवर्क म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘रत्नागिरी खबरदार’चा १२ वा वर्धापनदिन आज मोठ्या उत्साहात आणि मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. या निमित्ताने ‘रत्नागिरी खबरदार’च्या विशेष अंकाचे प्रकाशन लांजा-राजापूरचे आमदार श्री. किरण सामंत, प्रसिद्ध उद्योजक श्री. मुकेशशेठ गुंदेचा आणि प्रांताधिकारी श्री. जीवन देसाई यांच्या हस्ते करण्यात आले.
मान्यवरांच्या उपस्थितीत सोहळ्याला लाभली झळाळी
या प्रकाशन सोहळ्याला विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी उपस्थित राहून ‘रत्नागिरी खबरदार’च्या टीमला शुभेच्छा दिल्या. यावेळी शिवसेना शहर प्रमुख बिपीन बंदरकर, व्यापारी महासंघाचे तालुकाप्रमुख निखील देसाई, कर सल्लागार ब्रिजेश साळवी, उद्योजक दीपक पवार, दैनिक सकाळचे राजेश शेळके, दैनिक एक्स्प्रेसचे आनंद तापेकर, जेष्ठ पत्रकार भालचंद्र नाचणकर, माजी नगरसेवक सुदेश मयेकर, उद्योजक विजय खेडेकर, बांधकाम व्यावसायिक सौरभ मलुष्टे, शहर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष गणेश भिंगार्डे, बांधकाम व्यावसायिक दिनेश जठार, व्यावसायिक अमेय वीरकर, अमोल डोंगरे, अभिषेक सुर्वे, बांधकाम व्यावसायिक वीरेंद्र वणजु, तक्षशीला पतसंस्थेचे अध्यक्ष नितीन कांबळे यांच्यासह अनेक हितचिंतक आणि वाचक उपस्थित होते.
संघर्षाच्या ठिणगीतून डिजिटल क्रांतीचा वटवृक्ष
आजपासून तब्बल बारा वर्षांपूर्वी, २०१३ साली एका संघर्षाच्या ठिणगीतून ‘रत्नागिरी खबरदार’ नावाच्या एका लहानशा रोपट्याचा जन्म झाला होता, ज्याचा आज एका भल्यामोठ्या वटवृक्षात विस्तार झाला आहे. ‘रत्नागिरी खबरदार’ हे कोकणातील पहिले माध्यम ठरले, ज्याने डिजिटल पत्रकारितेचा पाया रचला.
२०१३ साली जेव्हा हा प्रवास सुरू झाला, तेव्हा अनेकांनी या नव्या प्रयोगाकडे पाहून भुवया उंचावल्या होत्या. मात्र, काळाचे चक्र फिरले आणि ज्यांनी तेव्हा डिजिटल माध्यमाकडे पाहून नाके मुरडली होती, आज त्याच माध्यमांना आपले अस्तित्व टिकवण्यासाठी याच डिजिटल मार्गाचा अवलंब करावा लागत आहे. या १२ वर्षांच्या यशस्वी प्रवासात ‘रत्नागिरी खबरदार’ने असंख्य वाचक आणि हितचिंतकांची अमूल्य साथ मिळवली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:32 03-10-2025














