गणपतीपुळे : जयगड येथील जेएसडब्ल्यू एनर्जीच्या औष्णिक ऊर्जा केंद्रातून नांदिवडे समुद्रात सोडले जाणारे विषारी पाणी पुन्हा एकदा स्थानिक मत्स्यसंपदेसाठी मारक ठरत आहे. सुमारे पाच-सहा वर्षापूर्वी घडलेली घटना पुन्हा घडल्याचे दृश्य जागरूक मच्छीमार आणि सामाजिक कार्यकत्यांनी पाहिले आहे. नांदिवडे समुद्रकिनारी गोबरा, तावीज, पालू, शितकं, वटिया यांसारखे बहुमोल मासे मृत अवस्थेत सापडले. हे मासे १० ते १५ किलो वजनाचे होते. त्रिमूर्ती मच्छीमार सहकारी संस्थेचे सदस्य जयवंत गजानन आढाव, संतोष हळदणकर, देवीदास हळदणकर यांनी ही माहिती जनसंपर्क अधिकारी नरेश बिलणकर यांना दिली. विलणकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
जिंदालच्या औष्णिक ऊर्जा केंद्रातून भर समुद्रात बिनदिक्कतपणे विषारी पाणी सोडले जात असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे याकडे अजिबात लक्ष नसल्यामुळे मच्छीमारांमध्ये तीव्र संताप आहे. जयवंत आढाव व सहकारी मच्छीमारांनी या विरोधात जनआंदोलन उभे करण्याचे संकेत दिले आहेत. जेएसडब्ल्यू एनर्जी कंपनी स्थानिक मच्छीमारांच्या उपजीविकेवर घाला घालत आहे. शासनाने याबाबत तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी स्थानिक जनतेने केली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:05 AM 04/Oct/2025














