Ratnagiri : दिवसाढवळ्या एलईडी मासेमारीचा धुडगूस

रत्नागिरी : रत्नागिरीच्या समुद्रात एलईडी दिव्यांच्या प्रकाशातील मासेमारी आतापर्यंत रात्रीच्या वेळी होताना दिसून आली आहे. परंतु आता ही बेकायदेशीर मासेमारी नजरेत येऊ नये यासाठी भर दिवसा आणि रात्रीही केली जात आहे. त्यामुळे पारंपारिक मच्छीमार नौकांना मासळी मिळेनाशी झाली आहे. या एलईडी धुडगूस कडे लक्ष वेधण्यासाठी सहायक मत्स्य व्यवसाय आयुक्त कार्यालयावर धडक देण्याचा निर्णय शाश्वत मच्छीमार हक्क संघाच्या सभेत झाला असल्याचे संघाचे अध्यक्ष रणजित उर्फ छोट्या भाटकर यांनी सांगितले.

पर्ससीन नेट मासेमारी १ सप्टेंबर पासून सुरु झाली. धोक्याच्या इशाऱ्यामुळे या मासेमारीचे काही दिवस वाया गेले असले तरी झालेल्या मासेमारीमध्ये बांगडा आणि म्हाकुळ मोठ्या प्रमाणात मिळाले. पर्ससीन नौकांना चांगली मासळी मिळत असतानाही काही नौकांनी एलईडी मासेमारी सुरु केली आहे. बेकायदेशीर मासेमारीमुळे पारंपरिक नौकांना कमी प्रमाणात मासळी मिळू लागली.

पारंपरिक मच्छिमारांनी दिवसा होणारी एलईडी प्रकाशातील मासेमारी पारंपारीक नौकांना मिळणारी मासळी कमी प्रमाणात मिळू लागल्या असल्याच्या तक्रारी येऊ लागल्या. या पार्श्वभूमीवर शाश्वत मच्छिमार हक संघांच्या रत्नागिरी तालुक्याची नुकतीच बैठक झाली. या बैठकीला अध्यक्ष छोट्या भाटकर यांच्यासह शंकर शिवलकर, विनायक मयेकर, विरेंद्र नार्वेकर, सचिन टाकळे, दत्तगुरु कीर, आमरीश धातकर, रोहीदास पारकर, गुरुनाथ शिरगावकर, संजय विलणकर, पिंकु बीजंय, समीर शेट्ये, शिवम पाटील, बंटी बनप, अमर पवार, दिनेश सावंत, बापू माईन आदी मच्छिमार उपस्थित होते.

दिवसाढवळ्या एलईडी मासेमारी करुन संध्याकाळी या नौका राजिवडा आणि मिरकरवाडा जेटीवर मासळी उतरवित आहेत. याकडे सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त कार्यालयाच्या अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यासाठी पुढच्या आठवड्यात धडक दिली जाणार आहे. अधिकाऱ्यांना समुद्रात नेऊन ही अवैध मासेमारी चालत आहे हे दाखवून देण्यास ही तयार असल्याचे संघाच्या अध्यक्षांनी सांगितले.

५ लाख रुपये दंडाची तरतूद
राज्य सागरी मासेमारीच्या सुधारीत अधिनियमांनुसार एलईडी मासेमारी करणाऱ्या नौका मालकांना ५ लाख रुपये दंड होण्याची तरतूद आहे. त्याचबरोबर जनरेटरसह एलईडीचे साहित्यसुद्धा जप्त केले जाते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:37 AM 04/Oct/2025