Guhagar : जानवळे गावाकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; मनसेचे सार्वजनिक बांधकाम उपविभागला निवेदन

गुहागर : गुहागर तालुक्यातील शृंगारतळी जानवळे फाटा मार्गे गावात जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. पादचाऱ्यांना चालणे अवघड झाले आहे, तर दुचाकीस्वारांसाठी हा रस्ता जीवघेणा ठरत आहे.

या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे काही दिवसांपूर्वी एस.टी. बसला अपघात झाला होता. सुदैवाने मोठा अनर्थ टळला; मात्र भविष्यात गंभीर अपघात घडू शकतो, असा इशारा देत या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रत्नागिरी उप जिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर यांनी केली आहे.

या संदर्भात त्यांनी नुकतेच सार्वजनिक बांधकाम उपविभाग, गुहागर यांना निवेदन सादर केले. निवेदनात त्यांनी स्पष्ट केले आहे की, रस्त्याची दुरुस्ती तातडीने करण्यात आली नाही तर मनसेच्यावतीने जानवळे रस्त्यावर ग्रामस्थांना घेऊन आंदोलन करण्यात येईल. याशिवाय, रस्त्यावरील दुर्लक्षामुळे अपघात घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी सार्वजनिक बांधकाम उपविभाग, गुहागर यांच्यावर राहील, असा इशार इशारा देखील निवेदनातून सार्वजनिक बांधकाम खात्याला देण्यात आला आहे. दि. २० ऑक्टोबरपर्यंत योग्य ती कार्यवाही करून रस्ता दुरुस्त न केल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आक्रमक भूमिका घेण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:51 AM 04/Oct/2025