पुणे : नृत्यांगणा गौतमी पाटील (Gautami Patil) हिच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. पुण्यातील एका अपघाताप्रकरणी पोलिसांनी तिला नोटीस बजावली आहे. वडगाव बुद्रुक परिसरातील एका रिक्षाला एका वाहनाने धडक दिली होती.
ते वाहन गौतीमी पाटील हिच्या नावावर असल्याने पोलिसांनी ही नोटीस बजावली आहे. या अपघातात रिक्षा चालक गंभीर जखमी असून सामाजी विठ्ठल मरगळे असे त्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी, पहाटे 5 वाजता पुण्यातील वडगाव बुद्रुक परिसरात एका भरधाव वाहनाने एका रिक्षाला धडक दिली. या अपघातात रिक्षा चालक गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर कारचालक फरार झाला होता. मात्र सीसीटीव्ही फुटेज तपासून पोलिसांनी 30 वर्षीय वाहन चालकाला अटक केली आहे.
Gautami Patil News : कार गौतमीच्या नावे
दरम्यान, ज्या वाहनाने रिक्षाला धडक दिली ते वाहन गौतमी पाटीलच्या नावावर असल्याची माहिती समोर आली. त्यामुळे सिंहगड रोड पोलिसांनी तिला नोटीस पाठवली आहे. या अपघात प्रकरणी चौकशीसाठी हजर रहावे असे या नोटीसमध्ये बजावण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
Pune Accident : पोलीस सहकार्य करत नसल्याचा आरोप
दरम्यान, गौतमी पाटील सेलिब्रिटी असल्यामुळे तपास योग्य होत नसल्याचा आरोप रिक्षा चालकाच्या नातेवाईकांनी केला आहे. संबंधित रिक्षा चालक यांच्यावर सध्या पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार, पोलिसांनी आरोपी बदलला आहे.
गौतमी पाटील हिच्या कार चालकाची चूक असताना हा अपघात झाला. मात्र या संपूर्ण प्रकरणाची गौतमी पाटीलच्या टीमकडून दखल घेण्यात आली नाही. तसेच पोलिसांकडून सीसीटीव्ही उपलब्ध होत नाही, पोलीस योग्य ते सहकार्य करत नाहीत असा आरोप आता रिक्षाचालक मरगळे यांच्या कुटुंबीयांनी केला.
Pune Accident : अपघात नेमका घडला कसा?
पुण्यातील मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावरील वडगाव पुलाजवळ एका हॉटेलसमोर समोर एक रिक्षा उभी होती. त्यात रिक्षाचालकासह दोन प्रवासी होते. मागून आलेल्या गौतमी पाटीलच्या भरधाव कारनं उभ्या असलेल्या रिक्षाला पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जबर होती की, यामध्ये रिक्षाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. या अपघातात रिक्षाचालकासोबतच रिक्षातील दोन प्रवासीही गंभीर जखमी झाले. पोलिसांना अपघाताबाबत माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:16 04-10-2025














