रत्नागिरी : शैक्षणिक वर्ष २०२५-२६ च्या मुंबई विद्यापीठ अंतर्गत कोकण विभाग पुरुष व महिला बॅडमिंटन स्पर्धेत रत्नागिरी मधील गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या (स्वायत्त) पुरुष बॅडमिंटन संघाने सलग तिसऱ्या वर्षी विजेतेपद पटकावून सुवर्ण पदक जिंकण्याची हॅट्रिक साधली आहे, तर महिला बॅडमिंटन संघाने सलग दुसऱ्यांदा सुवर्णपदक प्राप्त करून विजेतेपद प्राप्त केले.
दि. २९ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत मुंबई विद्यापीठ अंतर्गत कोकण झोन नं. ४ च्या पुरुष व महिला बॅडमिंटन स्पर्धा एस.आर. एम. कॉलेज कुडाळ येथे पार पडल्या. या स्पर्धेत गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या (स्वायत्त) पुरुष बॅडमिंटन संघाने सलग तिसऱ्या वर्षी विजेतेपदावर आपले नाव कोरले, तर महिला बॅडमिंटन संघाने सलग दुसऱ्या वर्षी विजेतेपद पटकावून महाविद्यालयाच्या पुरुष आणि महिला खेळाडूंनी कोकण विभागातील बॅडमिंटन मधले आपले वर्चस्व सिद्ध केले. महाविद्यालयाकडून सुवर्ण पदक विजेत्या पुरुष संघात सिद्धेश फणसेकर, अथर्व खेडेकर, आदित्य शिर्के, अथर्व कवितके, मिहिर वाघाटे, शर्विल संसारे, शौनक भावे हे विद्यार्थी सहभागी झाले होते.
तर महिला बॅडमिंटन संघात श्रुती फणसे, रिया मोरे, चार्वी कापडी, अपेक्षा राठोड, तन्वी घाणेकर, शर्वरी शिंदे, श्रुजेश्वरी आवळकर या विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. मुंबई विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन बॅडमिंटन पुरुष व महिला स्पर्धा-२०२५ साठी आणि विद्यापीठ संघ निवड चाचणीसाठी कोकण विभाग नं. ४ पुरुष बॅडमिंटन संघात महाविद्यालयाच्या सिद्धेश फणसेकर, अथर्व खेडेकर, आदित्य शिर्के या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे तर महिला बॅडमिंटन संघात कुमारी श्रुती फणसे या विद्यार्थिनींची निवड झाली आहे.
या दोन्ही संघांना क्रीडासंचालक डॉ. विनोद शिंदे, क्रीडा शिक्षक कल्पेश बोटके, माधव फणसे यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व विजयी खेळाडूंचे रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्प पटवर्धन, कार्यवाह सतीश शेवडे, जिमखाना समिती अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर केळकर, संस्थेचे सर्व सन्माननीय सदस्य, गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, तिन्ही विभागांचे उपप्राचार्य, महाविद्यालयाचे क्रीडा विभागाचे उपाध्यक्ष डॉ. विवेक भिडे, सर्व प्राध्यापक, कर्मचारी, सेवक यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:50 PM 04/Oct/2025














