Ratnagiri ZP Teacher : सातव्या टप्प्यांतील ११८ शिक्षकांची बदलीची प्रक्रिया पूर्ण…

रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या सातव्या टप्प्यांतील ११८ शिक्षकांची बदलीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. येत्या सोमवारनंतर म्हणजेच पुढील आठवड्यात कधीही त्यांना कार्यमुक्त करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया जूनमध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते; परंतु तांत्रिक अडचणींमुळे बदल्यांची प्रक्रिया सुरू होण्यास जुलै महिना उजाडला. संवर्ग १ मध्ये दिव्यांग शिक्षक, गंभीर आजारी, अपंग, विधवा, परित्यक्त्या, ५३ वर्षावरील शिक्षक यांचा समावेश होता.

त्याचबरोबर संवर्ग २ म्हणजेच पती-पत्नी एकत्रिकरणांतर्गत पात्र असलेल्या शिक्षकांचे ऑनलाइन अर्ज भरून घेण्यात आले. संवर्ग ३ मध्ये अवघड क्षेत्रातील बदलीसाठी पात्र ठरलेल्यांचा समावेश आहे. २०२२ मध्ये जिल्हा परिषद शिक्षण विभागाने निश्चित केलेली अवघड क्षेत्रातील शाळांची यादी यासाठी ग्राह्य धरण्यात आली. संवर्ग ४ मध्ये बदलीपात्र शिक्षकांचा समावेश करण्यात आला. एकाच शाळेत पाच वर्षे काम आणि अवघड क्षेत्रात १० वर्षे काम केलेल्या जिल्ह्यातील १,१०० शिक्षक बदली पात्रच्या यादीत होते. या प्रक्रियेमध्ये आतापर्यंत ४६४ शिक्षकांच्या बदल्या पूर्ण झालेल्या आहेत. त्यांना कार्यमुक्त करण्यात आलेले आहे.

सातव्या टप्प्यातील बदलीची ही प्रक्रिया आता पूर्ण झाली आहे. कारण क्षेत्रात १० वर्षे पूर्ण झालेल्या शिक्षकांना तेथे जावे लागणार, हे लक्षात आल्यानंतर काही शिक्षक न्यायालयात गेले. न्यायालयाकडून त्याला काही दिवस स्थगिती देण्यात आली होती. मात्र, आता स्थगिती उठविण्यात आलेली आहे. ही बदली प्रक्रिया पूर्ण झाली असून, या ११८ शिक्षकांच्या बदल्या होणार हे निश्चित झाले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:16 PM 04/Oct/2025