निष्ठावंताना डावलून बाळ मानेंना उमेदवारी ? मानेंना मातोश्रीवर बोलावले

बाळ मानेंना उमेदवारी

(बाळ मानेंना उमेदवारी) विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्ष तयारीला लागले आहे. निवडणुकांचे बिगुल वाजले असून निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकांचे निकाल लागणार आहेत. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ मात्र मागील अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. विद्यमान आमदार उदय सामंत हे मागील चार टर्म या मतदारसंघातून निवडून येतायत. यावेळी मात्र युतीतील घटक पक्ष असणाऱ्या भाजप मधील बाळ माने नाराज असून, रत्नागिरी करांना बदल हवाय असे म्हणत त्यांनी आपला इरादा स्पष्ट केलाय. याच पार्श्वभूमीवर आज दुपारी १ वाजता बाळ माने यांना मातोश्रीवर बोलावण्यात आले आहे.

काल शिसेनेच्या काही प्रमुख पदाधिकाऱ्यांना मातोश्रीवर बोलावण्यात आले होते. यावेळी त्यांना उमेदवारा बाबत आपले मत विचारण्यात आले. उबाठा मधून उदय बने आणि राजू महाडिक हे दोघे इच्छुक उमेदवार होते. यामधील कोणीही उमेदवार आम्हाला चालेल असे मत या बैठकीत पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आले होते अशी माहिती मिळत आहे. कोणत्याही परिस्थितीत निष्ठवान शिवसैनिकालाच उमेदवारी मिळाली पाहिजे अशी भूमिका देखील अनेक शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली होती. असे असताना आज दुपारी बाळ माने यांना मातोश्रीवर बोलावण्यात आले आहे. शिवसेनेचे जेष्ठ नेते भास्कर जाधव यांच्या माध्यमातून बाळ माने हे मातोश्रीच्या संपर्कात आहेत असे बोलले जात आहे.

भाजपचे माजी आमदार बाळ माने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करणार असून आज दुपारी 1 वाजता मातोश्रीवर बाळ माने यांचा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

बाळ मानेंना उमेदवारी

शिवसेने कडून उदय सामंत यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तर दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा उमेदवार देखील जवळपास निश्चित झाला असल्याची माहिती मिळत आहे. उद्धव ठाकरे उदय सामंतांविरोधात बाळ माने यांना उमेदवारी देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.