चिपळूण : लोटे औद्योगिक वसाहततीमधील परिसरात हवेतील प्रदषूण आणि जलप्रदूषण देखील वाढलेले आहे. याप्रदूषणाचा परिसरातील नागरिकांना त्रास होत आहे. याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना वारंवार पत्रव्यवहार करूनही काही फरक पडलेला नाही. आता प्रदूषण नियंत्रण मंडळाने ठोस कार्यवाही न केल्यास जनआंदोलन उभारू, असा इशारा घाणेखुंटचे सरपंच संतोष ठसाळे यांनी दिला आहे.
लोटे एमआयडीसीतील प्रदूषणबाबत सरपंच संतोष ठसाळे म्हणाले, ३० वर्षापूर्वी एमआयडीसीतील कंपन्यांची संख्या अधिक होती. मात्र गेल्या काही वर्षात विविध कारणांनी अनेक कंपन्या बंद पडल्या. तुलनेत नव्या कंपन्यांची संख्या तितक्याच प्रमाणात वाढलेली नाही. २० ते २५ वर्षापूर्वी लोटे परिसरात हवेतील प्रदूषण इतके नव्हते. सध्या सकाळी ६ ते ७ च्या सुमारास देखील नागिरकांचे डोळे चुरचुरल्या सारखे होत आहे. हवेतील प्रदूषणाचा वास लोकांना जाणवतो. प्रदूषणाचे परिणाम लोकांना सहन करावे लागत आहेत. हवेतील प्रदूषण तपासण्यासाठी एअर मॉनिटरिंग सिस्टम उभारण्यात आली. मात्र त्याचा अहवाल अद्याप समोर आलेला नाही.
उद्योगाकडून प्रदूषण टाळणे शक्य असतानाही त्याकडे लक्ष दिले जात नाही. येथील प्रदूषणाकडे अधिकारी कानाडोळा करत असल्याने ग्रामस्थांचा संताप वाढतो आहे. गावात कॅन्सर रूग्णांची संख्या वाढत आहे. अलिकडेच दोन कॅन्सर रुग्णांचा मृत्यू झाला, तर इतर दोघे कर्करोगाने त्रस्त आहेत. प्रदूषणामुळे कफ, दमा, त्वचारोग यासारखे आजार वाढत आहेत. प्रदूषणाला वेळीच आवर न घातल्यास घराघरात असे त्रस्त रुग्ण आढळण्याची भीती आहे. त्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाने वेळीच पावले उचलावीत, अन्यथा आम्हाला जनआंदोलन उभारावे लागेल, असा इशारा ठसाळे यांनी दिला आहे.
चिपळूण येथील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना गेल्या दोन वर्षापासून सातत्याने पत्रव्यवहार सुरू आहेत. मात्र, अधिकाऱ्यांकडून ठोस कारवाई होताना दिसत नाही. सीईटीपी प्रकल्प असतानाही चोरट्या मार्गाने प्रदूषित पाणी वारंवार खाडीला सोडले जाते. यावरून लोटे उद्योजकांनाही ग्रामपंचायतीने पत्रव्यवहार केलेला आहे. उद्योगांवर अनेकांची कुटुंबे अवलंबून आहेत, याचीही आम्हाला जाण आहे. – संतोष ठसाळे, सरपंच, घाणेखुंट
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:42 AM 06/Oct/2025














