Lanja : शिक्षकाच्या मनमानी कारभाराविरोधात देवधे ग्रामस्थ आक्रमक

रत्नागिरी : लांजा तालुक्यातील देवधे शाळा क्रमांक १ मधील एका शिक्षकाच्या मनमानी कारभाराला कंटाळून पालक व ग्रामस्थांनी अखेर शिक्षका विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. संबधित शिक्षकाची सखोल चौकशी करून योग्यती कारवाई करावी. पंधरा दिवसांच्या आत योग्य कारवाईसह शिक्षकाची बदली करावी. बदली न केल्यास एकही मूल शाळेत पाठवणार नाही, यासह जो पर्यंत संबंधित शिक्षकाची बदली होत नाही तो पर्यंत शाळा बंद आंदोलन छेडू, असा इशारा लांजा तालुक्यातील देवधे गावातील पालक व ग्रामस्थानी लांजा तालुका गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांना निवेदन दिले आहे.

संबधित शिक्षकाची तत्काळ बदली करावी, यासाठी तालुका स्तरावरून जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्रव्यवहार करावा अशी आग्रही मागणी लांजा तालुका गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे देवधे गावातील पालक व ग्रामस्थांनी केली आहे. गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांना निवेदन देताना मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ व महिला वर्ग उपस्थित होत्या.

याबाबत पालक व ग्रामस्थांनी तालुका प्रशासनाला व प्रसिद्धीसाठी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, तालुक्यातील देवधे शाळा क्र. १ येथे मंगेश कदम हे २०१९ पासून शिक्षक म्हणून सेवा बजावत आहेत. कदम हे मनमानी कारभार करत असल्याचा आरोप पालक व ग्रामस्थांनी केला आहे. व्यवस्थापन समितीचा कार्यकाल संपल्यानंतर अध्यक्ष यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला असतानाही नवीन समित्ती तयार करण्यासाठी पालकांची वेळोवेळी मागणी आहे.

मात्र नवीन समिती स्थापन करण्याऐवजी सदरील शाळेत मूल नसणाऱ्या आपल्या मर्जीतील व्यक्तीची हंगामी अध्यक्ष म्हणून निवड करणे आणि पालकांच्या मागणीला न जुमानता नवीन समिती स्थापन करण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप होत आहे. दरम्यान, शिक्षकावर कारवाई होईपर्यंत शाळा बंद आंदोलन करू असा इशारा देवधे गावातील पालक व ग्रामस्थ यांनी शिक्षण विभागाला दिला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:36 AM 06/Oct/2025