Ratnagiri : मासळी खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी…

रत्नागिरी : भारतीय हवामान विभागाने सर्व मच्छीमार, मच्छीमार सहकारी संस्था आणि नौका मालकांना पुढील काही दिवस समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये, अशा सूचना दिल्या आहेत. वादळी वारे आणि उंच लाटा येण्याची शक्यता असल्याने समुद्र अत्यंत खवळलेला राहील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. समुद्रातील धोक्याच्या इशाऱ्यामुळे पारंपरिक नौका मासेमारीसाठी समुद्रात जात नाहीत. त्यामुळे मासळी बाजारांमध्ये माशांचे दर वधारलेले आहेत. मात्र नवरात्रौत्सव व दसऱ्यानंतर उपवास सुटल्याने चढे दर असले तरी मासळी बाजारांत रविवारी ग्राहकांची गर्दी होती. ताजी मासळी नसल्याने मिरकरवाडा बंदरात बर्फात साठवून गोठवलेली मासळी विकली जात होती.

३ ऑक्टोबर ते ५ ऑक्टोबरपर्यंत हवामान विभागाने धोक्याचा इशारा दिल्याने मच्छीमार नौका बंदरातच उभ्या होत्या. याचा परिणाम म्हणून बंदरावर गोठवलेली मासळी उपलब्ध होती. जी काही थोडीफार ताजी मासळी मिळाली तिचा दर फारच चढ़ा होता.

आठवड्यापूर्वी जी छोटी सुरमई १५० ते २०० रुपये किलो दराने मिळत होती ती सुरमई ५०० रुपये दराने विकली जात होती. मोठ्या सुरमईचा एक किलोचा दर ५०० रुपये होता तो आता ८०० रुपये इतका झाला होता. पापलेट ५०० ते ६०० रुपये किलो दराने मिळत होते त्याचा एक किलोचा दर १ हजार रुपये इतका होता.

लहान सरंग्याचा दर २५० रुपयांवरून ४०० रुपयांवर तर मोठ्या सरंग्याचा दर ६०० रुपये किलो इतका होता. बांगडे मात्र १५० रुपये किलो दराने तर सौंदाळे २५० रुपये किलो दराने मिळत होते. जी कोळंबी २५० रुपये किलो दराने मिळायची त्या कोळंबीचा दर ५०० ते ६०० रुपये पर्यंत पोहोचला होता. परंतु, उपवास सुटल्यामुळे माशांच्या चढ्या दराचा ग्राहकांवर काही परिणाम झाला नाही.
बाजारपेठेतील मासळी मार्केटसह राजीवडा, मिरकरवाड्यातील मासळी बाजारांमध्ये ग्राहकांची गर्दी होती.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:46 AM 06/Oct/2025