Maharajaswa Abhiyan : निगुडवाडी ग्रामस्थांनी राबवली महिमतगडावर स्वच्छता मोहीम

लोटे : छत्रपती शिवाजी महाराजस्व स्वाभिमान अभियान अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा राबवण्यात येत आहे. यानिमित्त सहाय्यक संचालक (पुरातत्व), विभागीय कार्यालय रत्नागिरी व अभिरक्षक, प्रादेशिक वास्तुसंग्रहालय रत्नागिरी यांच्या मार्गदर्शनाखाली निगुडवाडी ग्रामस्थ तसेच दुर्ग महिमतगड प्रतिष्ठान यांनी एकत्र येऊन मंगळवारी महिमतगड किल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबवली. या मोहिमेत स्थानिक ग्रामस्थ व दुर्ग प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी भाग घेतला.

या मोहिमेच्या दरम्यान किल्ल्याच्या परिसरातील कचरा संकलन, झुडपांची सफाई, पायवाट स्वच्छता, बुरुज, तळी तसेच ऐतिहासिक वास्तूंच्या संवर्धनाबाबत जनजागृती करण्यात आली. याशिवाय उपस्थितांना स्वच्छतेचे महत्त्व, पर्यावरण संरक्षणाची गरज आणि ऐतिहासिक वारशाच्या जतनात नागरिकांची भूमिका याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

या उपक्रमामुळे स्थानिक पातळीवर सामाजिक ऐक्याची भावना दृढ झाली असून ऐतिहासिक स्थळांच्या संवर्धनाकडे ग्रामस्थ अधिक संवेदनशील झाले आहेत. स्वच्छता मोहिमेनंतर परिसर अधिक आकर्षक व पर्यटकांसाठी सोयीस्कर झाला आहे. पुढील काळात अशा मोहिमा सातत्याने राबवून महिमतगड किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व टिकवून ठेवण्याचा निर्धार ग्रामस्थ व दुर्ग प्रतिष्ठानने व्यक्त केला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:55 AM 06/Oct/2025