चिपळूण : शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह चिपळूण येथे प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. पात्र मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी ऑनलाईन hmas.mahait.org या संकेतस्थळावर अथवा ऑफलाईन अर्ज करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रभारी गृहपाल रवींद्र कुमठेकर यांनी केले आहे.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या या योजनेंतर्गत वसतिगृह मौजे कापसाळ (ता. चिपळूण) येथील भाडेतत्त्वावरील इमारतीत सुरू करण्यात आले आहे. इयत्ता ८ वीपासून पुढे शिकणाऱ्या, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयीन तसेच व्यावसायिक व बिगरव्यावसायिक अभ्यासक्रमातील स्थानिक नसलेल्या विद्यार्थ्यांना येथे प्रवेश दिला जाणार आहे. प्रवेशित विद्यार्थ्यांना शासन निर्णयानुसार निवास, भोजन, गणवेश व शैक्षणिक सुविधा मोफत उपलब्ध होणार आहेत.
वसतिगृहाची एकूण क्षमता ७५ असून सामाजिक आरक्षणानुसार जागांचे वाटप करण्यात आले आहे. अनुसूचित जातींसाठी ८५ टक्के, अनुसूचित जमाती ३%, विमुक्त जाती-भटक्या जमाती ५ टक्के, आर्थिक मागास व इतर प्रवर्ग ५% तसेच विशेष मागास प्रवर्गासाठी २ टक्के जागा आरक्षित आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:17 PM 06/Oct/2025














