Lanja : स्मार्ट मीटरमुळे रीडिंग एजन्सी संकटात

लांजा : महावितरणकडे मीटर रीडिंग, बिल प्रिंटींग व वितरणाचे काम करणाऱ्या राज्यभरातील एजन्सींनी मागण्यांकडे होणाऱ्या दुर्लक्षामुळे महावितरणविरोधात आंदोलनाचा इशारा दिला होता. याबाबत राज्याच्या मुख्य महाव्यवस्थापकांना निवेदन दिले होते. त्यानुसार मागण्या मान्य न झाल्याने १ ऑक्टोबरपासून काम बंद आंदोलन पुकारण्यात आले आहे. अनेक वर्षांपासून त्यांनी सातत्याने व नियमबद्ध पद्धतीने महावितरणचे रीडिंग व बिल वितरणाचे काम प्रामाणिकपणे केले आहे; मात्र राज्यभरात सुरू असलेल्या स्मार्ट मीटर बसवणीमुळे पारंपरिक रीडिंगचे काम मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे. परिणामी, रीडिंगचे काम मिळेनासे झाले असून कर्मचाऱ्यांना टिकवून ठेवणे कठीण झाले आहे.

स्मार्ट मीटर बसवणाऱ्या यंत्रणा अनेक ठिकाणी अर्धवट काम करून निघून जात असल्याने रीडिंग करणाऱ्यांसमोर ग्राहक शोधणे आणि रीडिंग घेणे ही मोठी समस्या झाली आहे. तसेच सध्याचे रीडिंग व बिल वितरणाचे दर अत्यंत अपुरे असल्याने आर्थिक तोटा होत आहे. यापूर्वी दरवाढीचा प्रस्ताव दिला असूनही त्यावर कोणताही निर्णय न झाल्याने असंतोष व्यक्त करण्यात आला आहे. २८ ऑगस्ट, १६ सप्टेंबर, २५ सप्टेंबर असे तीनदा निवेदन देऊनही कोणतीही कार्यवाही न झाल्याने अखेरीस मीटर रीडिंग एजन्सीने १ ऑक्टोबरपासून काम बंद आंदोलनाचा मार्ग अवलंबला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:40 PM 06/Oct/2025