चिपळूण : ग्रामीण आरोग्यसेवेत मोठा टप्पा पार करत डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात प्रगत न्यूरोनॅव्हिगेशन तंत्रज्ञानाचा वापर करून एक जटिल मेंदू अन्युरिझम क्लिपिंग शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडण्यात आली आहे. रुग्णालयाचे मेंदू शल्यविशारद डॉ. मृदुल भटजीवाले यांच्या नेतृत्वाखाली, प्रमुख भूलतज्ज्ञ डॉ. लीना ठाकूर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही शस्त्रक्रिया यशस्वी केली.
ही संपूर्ण शस्त्रक्रिया महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत विनामूल्य करण्यात आली. रुग्णाच्या मेंदूतील अतिशय गुंतागुंतीच्या रक्तवाहिन्यांच्या रचनेत असलेल्या गाठी पहिल्यांदाच शस्त्रक्रियेदरम्यान न्यूरोनॅव्हिगेशन तंत्रज्ञानाच्या मदतीने क्लिपिंग करून पुन्हा कार्यान्वित करण्यात आल्या. हे अत्याधुनिक तंत्रज्ञान मेंदूसाठी जीपीएससारखे कार्य करते. यामुळे शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांना अतिशय नाजूक भागातून अचूकतेने मार्ग काढता आला. धोक्याचे प्रमाण कमी झाले आणि अतिशय सुरक्षित पद्धतीने शस्त्रक्रिया पार पाडता आली.
या यशामुळे कोकणात अतिगुंतागुंतीच्या न्यूरोसर्जिकल शस्त्रक्रिया अद्ययावत तंत्रज्ञानाने करण्याची क्षमता वाढत असल्याचे सिद्ध झाले आहे. ज्या शस्त्रक्रिया आतापर्यंत केवळ महानगरांमध्येच शक्य होत्या, त्या आता कोकणातही शक्य झाल्या आहेत.
उपचारांना विलंब नको
डॉक्टर्सच्या म्हणण्यानुसार, रुग्णाची तब्येत उत्तम असून, त्याला लवकरच घरी सोडण्यात येईल. वारंवार होणारे डोकेदुखीचे झटके, आक्षेपार्ह फिट्स, दृष्टीमध्ये येणारे बदल किंवा अचानक आलेला अशक्तपणा यासारखी मेंदूच्या आजाराची लक्षणे दिसल्यास वैद्यकीय उपचार घेण्यात विलंब करू नये. कारण तत्काळ निदान जीव वाचवणारे ठरू शकते, असे आवाहन रुग्णालयातील डॉक्टर्सनी केले आहे.
योजनेचा लाभ घ्या
पात्र कुटुंबांनी शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेचा पूर्ण लाभ घ्यावा. कारण या योजनेंतर्गत आता जटिल न्यूरोसर्जरीसह सर्वात प्रगत उपचारांचा समावेश करण्यात आला आहे, अशी माहिती डेरवण रुग्णालयातर्फे देण्यात आली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:34 PM 06/Oct/2025














