Chiplun Congress : राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यालयावर चिपळूण काँग्रेस पदाधिकाऱ्यांची धडक

चिपळूण : अनेक वर्षापासून रखडलेली महामार्ग चौपदरीकरणाची कामे, निकृष्ट गटारे व फुटपाथची झालेली दुरवस्था, याबाबत चिपळूण काँग्रेसने येथील राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यालयावर शुक्रवारी धडक दिली. ठेकेदारांशी हातमिळवणी करून राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी वेळकाढू भूमिका घेतल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला. येत्या १५ दिवसांत कारभारात सुधारणा न झाल्यास कार्यालयास टाळे ठोकू व वेळ पडल्यास महामार्ग रोखू, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा सोनललक्ष्मी घाग व तालुकाध्यक्ष लियाकत शहा यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी अचानक राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यालयावर धडक दिली आणि शाखा अभियंत्यांना धारेवर धरले. उड्डाणपूल कामासाठी यंत्रणा वाढवून ते तातडीने मार्गी लावण्याची मागणी यापूर्वीही करण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कारभारात सुधारणा झालेली नाही. दरवेळी नवीन अधिकारी कार्यालयात थांबवून इतर अधिकारी फिरतीवर निघून जातात. निवेदन दिल्यानंतर मी नवीन आहे, माहिती घेऊन सांगतो, अशी चालढकल करण्यात येते. मात्र, यापुढे ही बनवाबनवी आम्ही चालवून देणार नाही. ठोस कार्यवाही झाली नाही तर जनतेला सोबत घेऊन आंदोलन छेडू, असा इशारा देण्यात आला.

यावेळी शहराध्यक्ष संतोष सावंत देसाई, संजय जाधव, सुबोध सावंत देसाई, कबीर काद्री, यशवंत फके, कांत चिपळूणकर, डॉ. सर्फराज गोठे, अजित शिंदे, लियाकत शेख, राजेंद्र भुरण इंतिखाब चौगुले, दादा आखाडे, महादेव चव्हाण, महिला तालुकाध्यक्षा निर्मल जाधव, शहराध्यक्षा वीणा जावकर, सफ गोठे, नंदा भालेकर, युवक जिल्हाध्यक्ष साजिद सरगुरोह, अ. ल. माळी, डो दीपक विखारे, अनिल रेपाळ, सुनील खेडेकर, विनायक जाधव, सुरेश राऊत कैसर देसाई आदी उपस्थित होते.

रखडलेल्या कामांबाबत अधिकाऱ्यांना विचारणा
महामार्गाच्या दुतर्फा वाढलेली झाडी व गवत, गटारांची निकृष्ट कामे, चालणेही कठीण असलेले फुटपाथ, अनेक महिने संथ गतीने सुरू असलेले उड्डाणपुलाचे काम यावर प्रश्न करण्यात आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:52 PM 06/Oct/2025