गुहागर : गुहागर शहरांमधील रस्त्यांवर पडलेले खड्डे दिवाळीपूर्वी त्वरित व व्यवस्थित भरण्याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तालुकाध्यक्ष सुनील हळदणकर यांनी सार्वजनिक बांधकाम उपविभाग गुहागर यांना निवेदन सादर केले आहे. गुहागर शहरांमधील रस्त्यांवर पडलेले खड्डे दिवाळीपूर्वी न भरल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते दिवाळीच्या दिवशी रस्त्यावरील प्रत्येक खड्यात अभ्यंग स्नान करतील असा इशारा मनसे गुहागर तालुकाध्यक्ष सुनील हळदणकर यांनी सार्वजनिक बांधकाम उपविभाग गुहागरच्या अधिकाऱ्यांना दिला आहे.
या निवेदनात पुढे म्हटले आहे की, गुहागर शहर हे शासकीय तसेच पर्यटनाच्या दृष्टीने गुहागर तालुक्यातील अत्यंत महत्त्वाचे ठिकाण आहे. मात्र दुर्दैवाची बाब अशी आहे की याच शहरातील रस्ते सध्या खड्डेमय अवस्थेत आहेत. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. याचा थेट परिणाम पर्यटनावर तसेच शहरातील नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर होत आहे. या रस्त्याच्या दुरुस्ती संदर्भात अनेक वेळा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने निवेदने सादर करण्यात आली होती. तरीही आजतागायत याची दखल घेण्यात आलेली नाही. इतक्या महत्त्वाच्या ठिकाणी रस्त्यांची दुर्दशा झाल्याने जनजीवन विस्कळीत होण्यास सार्वजनिक बांधकाम उपविभागच जबाबदार ठरेल. यामुळे कोणताही अपघात घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी देखील आपल्या विभागाची असेल.
जर आपण दिवाळीपूर्वी गुहागर शहरातील सर्व रस्त्यांवरील खड्ढे व्यवस्थित बुजवले नाहीत तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्या प्रत्येक खड्ड्यात दिवाळीच्या दिवशी अभ्यंग स्रान करेल. याची नोंद घ्यावी. म्हणूनच आपण त्वरित याकडे लक्ष घालून रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम सुरू करावे अशी मागणी शेवटी करण्यात आले आहे. या रस्त्यावरून नागरिकांना चालणेही मुश्किल झाले आहे. वाहने चालवताना वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे. तरी या संदर्भात त्वरित कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी ही करण्यात आली आहे. सदरचे निवेदन देताना तालुकाध्यक्ष सुनील हळदणकर, उप तालुकाध्यक्ष प्रसाद विखारे, गुहागर शहर अध्यक्ष अभिजीत रायकर, गुहागर तालुका विद्यार्थी सेना अध्यक्ष प्रथमेश रायकर, गुहागर तालुका सांस्कृतिक विभाग राहुल जाधव, महाराष्ट्र सैनिक दर्शन जांगळी, अक्षय जोशी आधी कार्यकर्ते उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:03 PM 06/Oct/2025














