Breaking : रत्नागिरीत कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चोरट्यांचा धुमाकूळ; छत्रपती नगरात दोन बंगले फोडले

रत्नागिरी : शहरात एकीकडे नागरिक कोजागिरी पौर्णिमेचा उत्सव साजरा करत असताना, दुसरीकडे चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास छत्रपती नगर परिसरात धाडसी घरफोडी करून पोलिसांना आव्हान दिले आहे. या घटनेत चोरट्यांनी दोन बंगले फोडले असून, एका बंगल्यातून सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे.

कोजागिरीच्या रात्री साधला डाव

शहरातील छत्रपती नगर येथे राहणारे काझी यांच्या बंद बंगल्याला चोरट्यांनी लक्ष्य केले. कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री उशिरा, सर्वत्र शांतता पसरलेली असताना चोरट्यांनी काझी यांच्या बंगल्याचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरात कोणी नसल्याची संधी साधत, चोरट्यांनी बंगल्यातील सोन्याचे दागिने आणि इतर मौल्यवान वस्तूंवर हात साफ केल्याचे समजते.

याच परिसरात राहणारे श्री. सावंत यांच्या घरातही चोरीचा प्रयत्न झाल्याचे उघडकीस आले आहे. सावंत कुटुंबीय बंगल्याच्या वरच्या मजल्यावर राहत असताना, चोरट्यांनी अत्यंत धाडसाने खालच्या मजल्यावरील घरात प्रवेश करून चोरीचा प्रयत्न केला.

घटनास्थळी पोलीस दाखल, तपास सुरू

घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. ठसे तज्ञ आणि श्वान पथकाच्या मदतीने चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला जात आहे.

सीसीटीव्हीचे जाळे असूनही धाडसी चोरी

विशेष म्हणजे, रत्नागिरी शहरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे मोठ्या प्रमाणात आहे. असे असतानाही, चोरट्यांनी मुख्य रस्त्यालगत असलेल्या छत्रपती नगर सारख्या वर्दळीच्या ठिकाणी घरफोडी करण्याचे धाडस दाखवल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या घटनेमुळे पोलिसांच्या रात्रीच्या गस्तीवर आणि शहराच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे छत्रपती नगर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.