गुहागर : शासनाच्या हवामान केंद्र उभारणीसाठी गुहागर तालुक्यातील ६६ पैकी ५३ ग्रामपंचायतीचे प्रस्ताव गुहागर कृषी विभागाकडे पाठवण्यात आले आहेत. उर्वरित ग्रा.पं.चे प्रस्तावही लवकरच प्राप्त होतील, अशी माहिती कृषी अधिकारी क्षिरसागर यांनी दिली.
सर्व गावांत हवामान विषयक अचूक माहिती प्राप्त व्हावी, शेतकऱ्यांना हवामानावर आधारीत कृषी विषयक सल्ला व मार्गदर्शन प्राप्त व्हावे, कृषी हवामान क्षेत्रात संशोधनासाठी तसेच नैसर्गिक आपत्तीच्या अनुषंगाने हवामान विषयक आवश्यक ती माहिती प्राप्त व्हावी, इ. बाबींच्या अनुषंगाने केंद्र शासनाच्या प्रकल्पांतर्गत राज्यात ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्यात येत आहेत.
राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून चक्रीवादळ, दुष्काळ, भूकंप, आग, पूर, त्सुनामी, गारपीट, दरड कोसळणे, बर्फखंड कोसळणे (हिमवर्षाव), ढगफुटी, टोळधाड, थंडीची लाट व कड्याक्याची थंडी या नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत देण्यात येते.
त्याचप्रमाणे ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्रांची उभारणी करण्यात आल्यास या सर्व नैसर्गिक आपत्तीच्या अनुषंगाने हवामान विषयक माहिती उपलब्ध होण्याच्या अनुषंगाने देखील ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्रांची स्थापना उपयुक्त ठरणार आहे. स्वयंचलित हवामान केंद्रांद्वारे तापमान, पर्जन्यमान, सापेक्ष आर्द्रता, वेग आणि दिशा या हवामान विषयक
घटकांची माहिती प्राप्त होणार आहे. या घटकांसंदर्भात स्वयंचलित हवामान केंद्रांद्वारे प्राप्त माहितीचा वापर एआय प्रणाली तसेच आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे हवामानविषयक माहितीचे संकलन, विश्वलेषण, शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन उपयुक्त ठरणार आहे.
गेल्या काही वर्षात हवामानात सातत्याने होत असलेल्या बदलावांचा आंबा, काजू बागायतींना फटका बसत आहे. त्यामुळे प्रत्येक ग्रामपंचायत क्षेत्रात हवामान केंद्र उभारण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. त्यासाठी हवामान केंद्र उभारणीसाठी आवश्यक शासकीय जागा उपलब्ध करुन देण्याचे या ग्रा. पं. नी ठरवले. यामध्ये गुहागर तालुक्यातील सर्वच ग्रा. पं. नी सकारात्मक प्रतिसाद देऊन आपले प्रस्ताव सादर केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:54 AM 07/Oct/2025














