लांजा : सोमवारी दुपारी २.३० वाजण्याच्या दरम्यान विजांचा झगमगाट आणि ढगांच्या कडकडाट करत पडलेल्या वादळी पावसाने लांजा तालुक्यात दाणादाण उडाली. याचा मोठा फटका महावितरणला बसला. महावितरणची बत्तीगुल झाल्याने अर्धा लांजा तालुका अंधारात बुडाला होता. अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
पावसाचा तडाखा सुरू असून, सोमवारी पडलेल्या वादळी पावसाने लांजा तालुक्यात हाहाकार उडवला. वादळी वाऱ्यासह विजांच्या झगमगाट करत कोसळलेल्या पावसाचा फटका महावितरणला बसला. ग्रामीण भागात विद्युत खांब वाकले, तर दहा ठिकाणी खांब उन्मळून पडले. काही गावांमध्ये विद्युत जनित्र जळाली आहेत. त्यामुळे अर्धा लांजा तालुक्याला सोमवारी रात्र अंधारात काढावी लागली. यामध्ये कणगवली गावातील शाळेनजीक असलेले विद्युत जनित्र, विजेचे दोन पोल जमीनदोस्त झाले. वनगुळे तेलीवाडी येथे दोन विद्युत खांब पडले, भांबेड जाधववाडी येथे दोन विद्युत खांब पडले, बाघ्रट रांबाडेवाडी येथे दोन विद्युत खांब पडले. कणगवली येथील धोकादायक विद्युत खांबबाबत अनेकवेळा ग्रामस्थांनी महावितरणला कळवले होतेः मात्र महावितरणकडून कोणतीही दखल न घेतल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. या गावांसह खेरवसे, बेनी, वाडगाव, केळंबे, विवली, हसोळ, आसगे, तळवडे, देवधे, धुंदरे अशा अनेक गावांमध्ये वीजपुरवठा पूर्णतः खंडित झाला होता.
कोसळलेल्या मुसळधार परतीच्या पावसाने तालुक्यात अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या. प्रभानवल्ली येथील जहांगीर कासम म्हालदार यांच्या घराचे छप्पर उडाल्याने ४ हजार ६०० रुपये नुकसान झाले. घर बंद असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. तसेच वेरवली खुर्द येथील बसंत रावणांक यांच्या गुरांचा गोठा कोसळून नुकसान झाले. लांजा तालुक्याला परतीच्या पावसाचा चांगलाच फटका बसत असून, असाच पावसाचा जोर सुरू राहिल्यास शेती नुसानला सामोरे जाण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
हाताला आलेली शेती गमावण्याची वेळ
दरदिवशी संध्याकाळच्या वेळी पडणाऱ्या परतीच्या पावसाने भात पिकांचे मोठे नुकसान केले असून, अजूनही काही दिवस असाच पाऊस सुरू राहिला तर शेतकरी ओल्या दुष्काळात सापडण्याची चिन्ह आहेत. हाताला आलेली शेती गमावण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:41 AM 23/Oct/2024














