लांजा : लांजा तालुक्यात सध्या पवसाने उसंत घेतल्याने भात पीक प्रसवण्याचा हंगाम सुरू झाला आहे. त्यामुळे अन्नाच्या शोधार्थ वन्यजीव लोकवस्तीकडे येत असल्याचे नजरेस पडत आहेत. मात्र वन्य प्राण्यांच्या शिकारीसाठी शिकारी टोळकी दबा धरून बसत असून, तालुक्याच्या ग्रामीण भागात रात्री-अपरात्री शिकारी टोळक्यांचा वावर सुरू झाला आहे.
तालुक्यात राजरोसपणे फिरणाऱ्या शिकारी टोळक्यांवर वेळीच आळा घालण्याची मागणी प्राणिमित्र व पर्यावरणप्रेमींकडून केली जात आहे. सध्या पाऊस कमी झाला असल्याने भातपिकाला पोषक वातावरण तयार झाले आहे. शेतकरीवर्ग भातपिकाच्या सुरक्षेवर भर देत आहे. पाऊस कमी होऊन कडक ऊन पडत असल्याने वन्य प्राणी अन्नाच्या शोधार्थ लोकवस्तीत नजरेस पडत आहेत. यामध्ये बिबट्या, गवा, भेकर, साळंदर, ससा, डुक्कर, खवलेमांजर हे वन्य प्राणी लोकवस्तीकडे वाळले आहेत. मात्र अन्नाच्या शोधासाठी भटकंती करणाऱ्या या रानटी प्राण्यांच्या शिकारीसाठी शिकारी टोळकी दबा धरु लागली आहेत. प्राण्याची शिकारीसाठी शिकारी टोळकी रात्री अपरात्री राजरोसपणे फिरत आहेत. भातपिकं खाण्यासाठी रानडुक्करे भात शेतमध्ये शिरकाव करत असतात. त्यामुळे ग्रामीण भागात डुक्करांची शिकार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात शिकारी टोळक्यांचा सुळसुळाट सुरू झाला आहे. रात्री-अपरात्री शिकारी टोळकी चार चाकी व दुचाकीवरून शिकारीसाठी फिरत असल्याचे नागरिकांच्या दृष्टीस पडत आहेत. या शिकारी टोळ्यांमुळे रात्रीच्यावेळी नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून रानडुक्करांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.
लांजा तालुक्यात गत काही वर्षांमध्ये डुक्करांची शिकार करताना डुक्कर समजून पाळीव गुरांना ठार मारल्याची घटना तर शिकारीसाठी लावलेल्या विद्युत तारेने माणसांचा बळी गेल्याच्या घटना घडल्या होत्या. ग्रामीण भागातील रस्त्यांवर राजरोसपणे फिरणाऱ्या या शिकारी टोळक्यांकडून वन्य प्राण्यांसह नागरिकांच्याही जीविताला धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.
ग्रामीण भागातील जंगल भाग व भात शेती असणाऱ्या रस्त्यांवरून शिकारी टोळकी दबा धरून बसत आहेत. त्यामुळे लांजा तालुक्याच्या ग्रामीण भागात शिकारी टोळक्यांवर वेळीच आळा घालावा, अशी मागणी पर्यावरण, प्राणी मित्र व सुज्ञान नागरिकांकडून केली जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:28 AM 07/Oct/2025














