संगमेश्वर : नवान्न पौर्णिमेनिमित्त घराच्या दरवाजावर व इतर ठिकाणी बांधण्यासाठी बाजारपेठेत नवान्नचे गुच्छ व जुड्या मोठ्या प्रमाणात विक्रीला उपलब्ध आहेत.
आज (ता. ७) नवान्न पौर्णिमा साजरी होत आहे. कोकणात घरोघरी ही पौर्णिमा साजरी होते. एक गुच्छ ३० रुपयांनी विकला जात असून, त्यामधून एक लाखांहून अधिक रुपयांची उलाढाल होते.
आश्विन महिन्यात पौर्णिमा दोन दिवस असली तरीही रात्री कोजागिरी आणि दुसऱ्या दिवशी नवान्न पौर्णिमा साजरी केली जाते. जर पौर्णिमा एकाच दिवशी असेल तर दिवसा नवान्न पौर्णिमा आणि त्याच रात्री कोजागिरी पौर्णिमा साजरी होते. नवान्न पौर्णिमेचे महत्व ग्रामीण भागात विशेषकरून शेतकरीवर्गामध्ये अधिक असते. शहरी भागातही काही ठिकाणी नवान्न पौर्णिमा साजरी केली जाते. भात, नाचणी, वरी अशा नवान्नच्या लोंब्या, सोबत आंब्याचे पाने, कुरडूचे अथवा झेंडूचे फूल एकत्र करून त्याचा गुच्छ तयार केला जातो. तो घराच्या प्रवेशद्वारावर बांधण्यात येतो. सध्या तयार गुच्छाचे महत्व वाढले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी महिला दोन दिवस आधी बाजारपेठेमध्ये हे गुच्छ घेऊन विक्रीला आलेल्या आहेत. यामधून त्यांना रोजगार उपलब्ध होतो. पूर्वी उखळीमधून भात सडून तांदूळ काढला जायचा, आता उखळ नसली तरी नवीन धान्य गिरणीवरून भरडून आणले जाते. बदलत्या परिस्थितीमध्येही नवान्न पौर्णिमाची परंपरा आजही कोकणात पाळली जात आहे. नवान्न पौर्णिमेसाठीचे गुच्छ विक्री करून ग्रामीण भागातील शेतकरी महिलांना उत्पन्न मिळत आहे.
निसर्गाप्रति कृतज्ञता व्यक्त
नवान्न म्हणजे नवीन अन्न. नवीन अन्न उपयोगात आणण्याचा हा दिवस. शेतकऱ्यांनी भातकापणी करून घरामध्ये आणलेल्या धान्याची झोडणी केली जाते व पौर्णिमेच्या दिवशी या नव्या तांदळाची खीर नैवेद्य म्हणून कोकणात दाखवली जाते. याच दिवशी नवा भात करून खाल्ला जातो. विशेष म्हणजे दाराला नव्या भाताच्या लोंब्या लावून तसेच त्यांचे तोरण बांधून निसर्गापोटी व शेतीपोटी कृतज्ञता व्यक्त केली जाते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:05 07-10-2025














