रत्नागिरी जिल्ह्यातील पाचही जागा काँग्रेस लढवणार : अविनाश लाड

रत्नागिरी : एकीकडे महाविकास आघाडीत एबी फॉर्मचे वाटप करीत असताना दुसरीकडे मात्र आघाडीत बिघाडीही होताना दिसत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात काँग्रेसने बंडाचे निशाण फडकवले असून, जिल्ह्यात काँग्रेसला एकही जागा मिळत नसल्यामुळे नाराज कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातले पाचही विधानसभा मतदारसंघात काँग्रेसकडून उमेदवार उभे करणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांनी दिली.

रत्नागिरीतील काँग्रेस भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राजापूर लांजा साखरपा या विधानसभा मतदारसंघातून राजन साळवी यांच्याविरोधात आपण स्वतः उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे अविनाश लाड यांनी सांगितले. त्या ठिकाणी शिवसेना ‘उबाठा’ आता राहिली नाही. शिवसेना संपली असून उरलीसुरली शिवसेना उबाठा देखील शिंदे गटात प्रवेश करत असल्याची टीका यावेळी अविनाश लाड यांनी केली. दरम्यान, काहीही झाले तरी मी शंभर टक्के विधानसभा निवडणूक लढवणार असे लाड यांनी स्पष्ट केले आहे.

लोकसभा निवडणुकीवेळी राजापूर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेपेक्षा काँग्रेसनेच मताधिक्य दिल्याचेही लाड यांनी सांगितले. शिवाय लोकसभेसाठी शिवसेना असली तरी विधानसभेला काँग्रेसचा विचार केला जाईल असेही विनायक राऊत यांनी सांगितल्याचे अविनाश लाड यांनी पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केले.

दरम्यान, काँग्रेसला एकही जागा मिळत नसल्यामुळे रत्नागिरी मध्ये काँग्रेसच्या काही प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडला. यानंतर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी बंडाचे निशाण फडकवले आहे. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कोकणात देखील काँग्रेसची भूमिका पाहता महाविकास आघाडीत बिघाडी चव्हाट्यावर आली आहे.

चिपळूण मतदारसंघामधून काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी सुनील सावर्डेकर लवकरच उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. राजापूर व चिपळूणप्रमाणेच रत्नागिरी, दापोली व गुहागर विधानसभा मतदारसंघातही काँग्रेस आपली ताकद दाखवणार असल्याचे अविनाश लाड यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:52 AM 23/Oct/2024