रत्नागिरी : शालेय शिक्षण विभागाने समूह साधन केंद्र समन्वयक म्हणजेच केंद्रप्रमुख पदासाठी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेचा कार्यक्रम घोषित केला आहे. त्यासाठी १ ते ५ डिसेंबरदरम्यान या पदांसाठी ऑनलाइन परीक्षा घेण्यात येणार आहे. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यात १२५ पदे असून, त्यातील ८ पदे उर्दू भाषिक आहेत. तसेच दिव्यांगांसाठी ५ पदे राखीव ठेवण्यात आली आहेत.
जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागात २,३८४ प्राथमिक शाळा आहेत. १० ते १२ शाळांचे एक केंद्र ठरविण्यात आले आहे. याला एक केंद्रप्रमुख नियुक्त केलेला असतो. हा केंद्रप्रमुख शिक्षकांमधून भरला जातो. केंद्र समन्वयक पदासाठी पात्रता नमूद करताना म्हटले आहे की, संबंधित जिल्हा परिषदेमधील शाळेवर कार्यरत शिक्षक पात्र असणे आवश्यक आहे. कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची बीए, बीकॉम, बीएससी यापैकी पदवी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. किमान ६ वर्षे अखंडित सेवा पूर्ण करणे आवश्यक आहे. शिक्षण सेवक पदावरील सेवा ग्राह्य धरण्यात येईल. टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
बुद्धिमत्ता व अभियोग्यता, शालेय शिक्षणातील नियम, अधिनियम व शैक्षणिक नवप्रवाहाबाबत प्रश्नपत्रिकेत विषयांचा समावेश असेल. राज्य घटनेतील शिक्षणविषयक तरतुदी शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या सरकारी संघटना, अभ्यासक्रम च मूल्यमापन आदींवर लेखी परीक्षा घेण्यात येईल.
स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून केंद्रप्रमुखांच्या १२५ पदांच्या भरतीचा घेतलेल्या शासनाच्या निर्णयाचे स्वागत करतो. त्याचबरोबर शासनाने पदोन्नतीने भरण्यात येणारी केंद्रप्रमुखांच्या रिक्त पदांचीही भरती करावी. कारण, टीईटी परीक्षा देण्यासाठी दोन वर्षांच्या कालावधीची मुदत शासनाने दिली आहे-बाबाजी शिर्के, जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य केंद्रप्रमुख संघटना, रत्नागिरी.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:04 PM 07/Oct/2025














