रत्नागिरी : विद्यार्थ्यांचा शैक्षणिक स्तर तपासण्यासाठी नियतकालिक मूल्यमापन चाचणी (पॅट) परीक्षा दि. १० ते १३ ऑक्टोबर या कालावधीत घेण्यात येणार आहे. इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा द्यावी लागणार आहे. ‘पॅट’ चाचणीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या चुका सुधारण्याची संधी दिली जाते. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणेतर्फे भाषा, इंग्रजी व गणित या विषयांच्या प्रश्नपत्रिका तयार केल्या जातात. तसेच यावर्षी राज्यस्तरावरून तालुकास्तरासाठी प्रश्नपत्रिकेचे वितरण केले जाणार आहे. परीक्षेच्या काही दिवस आधी प्रश्नपत्रिका उपलब्ध होणार आहेत.
या परीक्षेद्वारे विद्यार्थ्यांचा इंग्रजी, भाषा, गणित या विषयाचा पायाभूतस्तर तपासला जाणार आहे. एकूणच विद्यार्थ्यांच्या अभ्यासातील प्रगतीचा आढावा घेणे, शिक्षणात सुधारणा करण्यासाठी आवश्यक बदल करणे यासाठी पायाभूत स्तर चाचणी करण्यात येणार आहे. सध्या शाळांतून सहामाही परीक्षा सुरू असतानाच ‘पॅट’ परीक्षा द्यावी लागणार आहे.
पॅटचा नेमका उद्देश काय?
जिल्हा परिषद, नगर परिषद, खासगी अनुदानित शाळांतील दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासातील प्रगतीचा आढावा घेणे, पायाभूत स्तर तपासण्यासाठी ‘पॅट’ परीक्षा घेण्याचा उद्देश आहे.
सहामाहीच्या नियोजनचा अधिकार यंदा शाळांनाच
सध्या बहुतांश शाळांमध्ये सहामाही परीक्षा सुरू आहेत. त्यामुळे या परीक्षा सुरू असतानाच ‘पॅट’ परीक्षाही घ्यावी लागणार आहे.
गुण फक्त मूल्यांकनासाठीच
पॅट परीक्षेतील गुणांकन फक्त विद्यार्थ्यांचा शैक्षणिक स्तर तपासण्यासाठी असणार आहे.
दहा माध्यमांत होणार परीक्षा
मराठी, उर्दू, इंग्रजी, हिंदी, कन्नड, गुजराती, तमिळ, तेलगू, सिंधी, बंगाली अशा दहा माध्यमात परीक्षा होणार आहे. मात्र, पेपर तीनच असणार आहेत.
अधिकारी देणार भेट
शिक्षणाधिकारी (प्राथमिक, माध्यमिक, योजना), उपशिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख परीक्षा केंद्रांना भेटी देऊन पाहणी करणार आहेत.
जिल्ह्यात एक लाख विद्यार्थी बसणार
रत्नागिरी जिल्ह्यातील दुसरी ते आठवीचे एकूण एक लाख सात हजार १८ विद्यार्थी ‘पॅट’ परीक्षेसाठी बसणार आहेत. सर्व शाळांमध्ये दि. १० ते १३ ऑक्टोबर या कालावधीत परीक्षा घेण्यात येणार असून, शाळांमध्ये परीक्षेचे नियोजन सुरू आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:20 PM 07/Oct/2025














