Khed : खाडीपट्टा विभागातील रस्त्यासाठी हशमत परकार यांचे उपोषण

खेड : खेड तालुक्यातील खाडीपट्टा विभागातील ग्रामस्थांच्या दीर्घकालीन मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते मा. श्री. हसमत भाई परकार यांनी आज दिनांक ७ ऑक्टोबर पासून आमरण उपोषण सुरू केले आहे. खाडीपट्टा विभागातील सवणस रांगलेवाडी ते सवणस सडे, अणसपुरे, सवणस घोणसवणे, तळघर, मुलगाव, तुंबाड, बहिरवली, होडखाड आणि पन्हाळजे या गावांना जोडणाऱ्या रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. या भागातील ग्रामस्थांना रस्त्याच्या दुरावस्थेमुळे रोजच्या जीवनात मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यासाठी खडीपट्टा विभागातील सामाजिक कार्यकर्ते हशमत परकार यांनी अखेर आज आपले उपोषण सुरू केले.

हशमत परकार यांनी या रस्त्याच्या कामासाठी गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिक प्रशासन आणि लोक प्रतिनिधींनीकडे मागणी करत होते. अनेक वेळा त्यांना केवळ आश्वासने दिली गेली, मात्र प्रत्यक्षात कामाची सुरुवात झालीच नाही. सध्या या रस्त्याची पूर्णपणे दुरवस्था झाली असून यामुळे शेतकरी, विद्यार्थी आणि रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे अखेर या प्रश्नासाठी त्यांनी शेवटचा उपाय म्हणून उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे. त्यांच्या या आंदोलनाला परिसरातील नागरिक, शेतकरी आणि तरुण वर्गाकडून मोठा पाठिंबा मिळत आहे. प्रशासनाने तत्काळ या उपोषणाची दखल घेऊन याच्यावर तोडगा काढावा अशी मागणी आता सर्वसामान्य जनतेतून व्यक्त केली जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:43 PM 07/Oct/2025