Ratnagiri: रत्नागिरी नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी आज प्रभागनिहाय आरक्षण सोडत

रत्नागिरी : रत्नागिरी नगरपरिषदेच्या सन २०२५ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभागनिहाय आरक्षणाची सोडत बुधवार ८ ऑक्टोबर रोजी काढण्यात येणार आहे. अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला), नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) आणि सर्वसाधारण महिलांसाठी ही सोडत काढली जाईल, अशी माहिती रत्नागिरी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी वैभव गारवे यांनी जाहीर सूचनेद्वारे दिली आहे.

मुख्याधिकारी वैभव गारवे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोडत काढण्याचा कार्यक्रम नगरपरिषदेच्या संत गाडगेबाबा सभागृहात बुधवारी सकाळी ११ वाजता पार पडेल. या सोडतीनंतर आरक्षण गुरुवारी ९ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रसिद्ध केले जाईल.

​आरक्षण प्रसिद्ध झाल्यानंतर नागरिकांना यावर हरकती व सूचना दाखल करण्यासाठी गुरुवार ९ ऑक्टोबर २०२५ पासून मंगळवार, १४ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. नागरिकांनी आपल्या हरकती व सूचना मुख्याधिकारी यांच्याकडे निवडणूक कार्यालय किंवा संबंधित प्रभाग कार्यालयाच्या मुख्यालयात सादर करायच्या आहेत.

​हरकती व सूचना दाखल करणाऱ्या नागरिकांना आवश्यक असल्यास सुनावणीसाठी उपस्थित राहण्याबाबत स्वतंत्रपणे कळविण्यात येईल, असेही या सूचनेत स्पष्ट करण्यात आले आहे. या आरक्षण सोडतीकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:08 08-10-2025