राजापूर : राजापूर नगर परिषदेच्या प्रभागांतील नगरसेवक पदांसाठीची आरक्षण सोडत बुधवारी, ८ ऑक्टोबर रोजी होणार आहे. नगर परिषदेच्या बॅ. नाथ पै सभागृहात सकाळी ११ वाजता पीठासन अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ. जॅसमिन यांच्या अध्यक्षतेखाली ही आरक्षण सोडत होणार आहे.
राजापूर नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीची तयारी सध्या प्रशासनाकडून सुरू असून अंतिम प्रभाग रचनेनंतर आता प्रभागांतील नगरसेवक पदासाठीची आरक्षण सोडत काढली जाणार आहे. या निवडणुकीत नगराध्यपदासाठी थेट निवडणूक होणार असून सोमवारी मुंबईत झालेल्या नगराध्यक्षपदाच्या आरक्षण सोडतीत राजापूर नगर परिषदेचे नगराध्यक्षपद हे सर्वसाधारण महिला आरक्षित झाले आहे.
नव्याने झालेल्या प्रभाग रचनेनुसार आता शहरातील दहा प्रभागांतून २० नगरसेवक निवडून द्यावयाचे असून त्यासाठी बुधवारी ही आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. एकूण दहा प्रभागांतील वीस नगरसेवक पदांसाठी होणाऱ्या या आरक्षण सोडतीत ५० टक्के महिला आरक्षणानुसार यातील दहा जागा या महिला आरक्षित रहाणार आहेत. या दहा प्रभागांपैकी प्रभाग क्रमांक पाच मधील एक जागा ही अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित असणार आहे. तर पाच जागा या नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित असणार असून यामध्ये दोन नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला राखीव असणार आहे.
दहा प्रभागांतील २० जागांसाठी ही आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. यासाठी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन मुख्याधिकारी तुषार बाबर यांनी केले आहे. या आरक्षण सोडतीकडे राजकीय पक्षाच्या इच्छुकांचे लक्ष लागून राहिले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:09 AM 08/Oct/2025














