लांजा : भारताच्या सरन्यायाधीशांच्या दिशेने बूट फेकणाऱ्या वकील राकेश किशोर तिवारी यांनी केलेल्या कृत्याचा निषेध व्यक्त करत त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी लांजा तालुका बौद्धजन संघ यांच्यावतीने मंगळवारी राष्ट्रपती यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
लांजा तालुका बौद्धजन संघ यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना दिलेले पत्र लांजा तहसीलदार प्रियांका ढोले यांनी हे निवेदन स्वीकारले. दिलेल्या निवेदनात तालुका बौद्धजन संघाने म्हटले आहे की, या कृत्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. अशा निंदनीय कृत्यामुळे या वकिलाची मनुवादी विचारसरणी दिसून आली आहे. सध्या देशामध्ये असे हिंसक वातावरण निर्माण करुन पुरोगामी विचारसरणीला संपविण्याचा प्रयत्न होत असल्याचे निदर्शनास येत असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर लांजा तहसीलदार प्रियांका ढोले यांना निवेदन सादर करताना बौद्धजन संघाचे सुधाकर कांबळे, उपाध्यक्ष आनंद कांबळे, सरचिटणीस उज्ज्वल पवार, संतोष पवार, जितेंद्र यादव, सुनील कांबळे, गौतम सावंत, अनिल कांबळे उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:30 AM 08/Oct/2025














