खेड शिवापूर टोल नाक्यावर पाच कोटी जप्त

खेड : पुणे-सातारा महामार्गावरील खेड शिवापूर येथील टोल नाक्यावर सोमवारी संध्याकाळी सव्वासहाच्या दरम्यान एका कारमधून पाच कोटी रुपयांची रक्कम पोलिसांनी ताब्यात घेतली. याबाबत गाडीमधील चारजणांना ताब्यात घेतल्याचे समजते. ही कार सांगोला येथील व्यापाऱ्याची आहे.

एका कारमधून (एमएच ४५ एएस २५२६) मोठ्या प्रमाणावर रोकड नेली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर त्यांनी खेड शिवापूर टोल नाक्यावर सापळा रचून ही कार येताच ती तपासणीसाठी पोलिस चौकीवर आणली. तेथे गाडीची तपासणी केली असता त्यामध्ये सुमारे पाच कोटींची रक्कम आढळून आली. याबाबत गाडीमधील चारजणांना ताब्यात घेतले असून रक्कम कोणाची आहे व इतर बाबींची माहिती घेतली जात आहे.

कार बड्या नेत्याच्या कार्यकर्त्याची
ही कार सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथील अमोल शहाजीराव नलावडे यांच्या नावे आहे. ते धरणीमाता अॅग्रो प्रॉड्युसर कंपनी लिमिटेडचे मालक असून गाळा नंबर २३, मार्केट यार्ड, सांगोला, जि. सोलापूर असा कंपनीचा पत्ता आहे. अमोल नलावडे हे एका राजकीय पक्षाच्या बड्या नेत्याच्या अतिशय जवळचे कार्यकर्ते असल्याचे समजते.

कार तातडीने हलविली; गूढ कायम
जप्त केलेली रक्कम पोलिसांनी खेड शिवापूर चौकीत ठेवली. मात्र, कार तातडीने कामथडी येथील पोलिस ठाण्यामध्ये हलवली. यामागे राजकीय दबाव आहे की काय, अशी शंका व्यक्त केली जात आहे. कार तातडीने हलविण्याचे गूढ कायम आहे. या घटनेचे वृत्तांकन करण्यास आलेल्या पत्रकारांनाही पोलिस ठाण्यापासून दूर अंतरावर थांबविण्यात आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:02 AM 23/Oct/2024