साडवली : संगमेश्वरचे गटशिक्षणाधिकारी म्हणून विजय परीट यांची नुकतीच नियुक्ती झाली असून, त्यांनी या महत्त्वाच्या पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या अनुभवामुळे आणि पूवींच्या यशस्वी कामामुळे त्यांच्या नियुक्तीने या विभागाला एक सक्षम नेतृत्व लाभले आहे. यापूर्वी गटशिक्षणाधिकारी पदाचा प्रभारी कार्यभार शशिकांत त्रिभुवणे यांच्याकडे होता.
वाळवा तालुक्यातील कासेगाव येथील रहिवासी असलेले परीट यांचा प्रशासकीय तसेच शिक्षण क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव आहे. यापूर्वी ते पाटण येथे शालेय पोषण आहार अधीक्षक या पदावर कार्यरत होते. त्यांनी मुंबई विभागात प्राप्तिकर अधिकारी म्हणूनही काम केले आहे.
प्रशासकीय कामकाजाचा अनुभव आणि शिक्षण विभागाची सखोल माहिती यामुळे संगमेश्वरच्या शिक्षण विभागाच्या धोरणात्मक निर्णयांमध्ये त्यांची भूमिका निर्णायक ठरू शकेल. त्यांच्या नियुक्तीबद्दल विविध शिक्षण संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले असून, त्यांना भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तालुक्यातील शिक्षणाची गुणवत्ता वाढावी, यासाठी ते प्रभावीपणे काम करतील, असा विश्वास या संघटनांनी व्यक्त केला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:07 AM 08/Oct/2025














