Ratnagiri : जयगड-हातखंबामार्गावर अवजड डंपर वाहतूक रोखली

रत्नागिरी : जयगड ते हातखंबा या मार्गावरील अपघात वाढत असतानाही जयगड परिसरात जेएसडब्ल्यू पोर्ट व आंग्रे पोर्ट यांच्या संबंधाने अवजड वाहनांनी खबरदारी न घेता राजरोस मालवाहतूक सुरू आहे. जीवघेणे अपघात होताहेत; पण प्रशासनाकडून त्यावर उपाययोजना होत नसल्याने काल जयगड रस्त्यावर खंडाळा सामाजिक संस्थेच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थ रस्त्यावर उतरले. मार्गावरील डंपरद्वारे होणारी अवजड वाहतूक रास्ता रोको करून रोखून धरली. ही वाहतूक बंद होईपर्यंत ग्रामस्थांनी मागे न हटण्याचा निर्धार केला.

काल दुपारी जयगड-वाटद मार्गावर ग्रामस्थ रस्त्यावर उतरले. संतप्त प्रामस्थांनी या मार्गावरून होणारी डंपरी मालवाहतूक रोखून धरली. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. ग्रामस्थ रस्त्यावर उतरल्याने पोलिस फौजफाटाही तातडीने दाखल झाला. प्रथमेश गवाणकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. त्यामध्ये पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने यामध्ये सहभाग दर्शवला होला. या आंदोलनकर्त्यांची समजूत काढण्या प्रयत्न पोलिसांनी केला. मात्र, जोपर्यंत या वाहतुकीवर लगाम घातला जात नाही, तोपर्यंत मागे न हटण्याचा निर्धार खंडाळा पंचक्रोशी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष गवाणकर व त्यांचे सहकारी, ग्रामस्थांनी केला.

प्रशासनाच्या चुकीच्या धोरणामुळे सर्वसामान्य जनतेचे बळी जात असल्याचा खळबळजनक आरोप जयगड परिसरातील सामाजिक कार्यकर्ते प्रथमेश गावणकर यांनी यावेळी केला. २००५ पासून जयगड परिसरात जेएसडब्ल्यू पोर्ट व आंग्रे पोर्ट यांच्या माध्यमातून या रस्त्यावरून माल वाहतूक सुरू झाली. या दोन्ही पोर्टची व्याप्ती कमी प्रमाणात असल्यामुळे फारसा त्रास जाणवत नव्हता. मात्र, १० वर्षात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात माल वाहतूक वाढली आहे. त्यातुलनेने रस्ता तसाच आहे. रस्त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त ओव्हरलोड वाहतूक, खराब रस्ते व चालकांच्या मस्तीमुळे अनियंत्रित वेग यापरिणामी या रस्त्यावर अपघात होत आहे. यावर प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना केल्याचे दिसत नाही.

अवजड वाहतुकीवर बंधने घाला
नुकताच हातखंब्यामध्ये एका कंटेनरच्या भीषण अपघातात २० वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. तेथे सर्वसामान्य नागरिकांना या रस्त्यावरून जीव मुठीत घेऊन जावे लागत आहे. अशा घटनांमुळे परिसरातील स्थानिक नागरिकांच्या रोषातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून प्रशासन कार्यालयात प्रत्यक्ष भेट देऊन निवेदन देण्यात आले होते, तरीही अवजड वाहतुकीवर बंधने घालण्यात आलेली नाहीत. त्यामुळे हे आंदोलन करण्यात आले, असे यावेळी सांगण्यात आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:41 AM 08/Oct/2025