Chiplun : चिपळूण, घोणसरेत विंचूदंशावर मोफत प्रतिविष सिरम

चिपळूण : घोड्याचे रक्त वापरून तयार करण्यात आलेले विंचूदंश प्रतिविष सिरम (प्रिमिस्कॉर्प अँटिव्हेनम) नारायणगाव, पुणे येथील प्रीमियम सिरम्स अँड व्हॅक्सिन्स कंपनीने अतिशय अद्ययावत लॅबोरेटरीमध्ये तयार केले आहे. चिपळूण आणि घोणसरेत हे प्रतिविष सिरम मोफत उपलब्ध होणार आहे, अशी माहिती डॉ. विवेक नातू यानी दिली.

हे (प्रिमिस्कॉर्प अँटिव्हेनम) चिपळूण येथील डॉ. तात्यासाहेब नातू लहान मुलांचे हॉस्पिटल व घोणसरे (उमरोली) येथील विजयश्री हॉस्पिटल येथे १० ऑक्टोबरपासून एक वर्षाच्या कालावधीसाठी मोफत उपलब्ध झाले आहे. विंचूदंशावर उपचारही नाममात्र खर्चात एक वर्षाच्या कालावधीसाठी होणार असून, रुग्णांनी याचा लाभघ्यावा असे आवाहन डॉ. विवेक नातू यांनी केले आहे.

विचूदंशाच्या प्रतिविषावर १६ वर्षांपूर्वी डॉ. विवेक नातू, डॉ. विकास नातू, डॉ. संतोष कामेरकर आणि त्यांच्या टीमने केलेल्या संशोधनामुळे विंचूदंशामुळे होणाऱ्या मृत्यूचे व होणाऱ्या शरीराच्या हानीचे प्रमाण अतिशय कमी झाले आहे. या प्रतिविष संशोधनाविषयी सांगताना डॉ. नातू म्हणाले, २०१० मध्ये आम्ही डॉक्टरांनी यावर संशोधन केले. हे सिरम विंचवाचे प्रतिविष हे विषावरच प्रतिहल्ला करून त्याला निकामी करते. मुळात विषच निकामी झाल्यामुळे शरीरात प्रचंड प्रमाणात निर्माण होणारा अॅड्रिनॅलिनचा स्त्राव थांबतो. अॅट्रिनलिन हे रक्तात ५ मिनिटांपेक्षा जास्त राहत नसल्याने १ तासात सुधारणा सुरू होते व पेशंट २-४ तासांत पूर्णपणे बरा होऊ शकतो. रुग्णाच्या शरीरात जाणारे विषाचे प्रमाण हे वेगवेगळे असते व ऋतुमानाप्रमाणे व विंचवाच्या क्षमतेप्रमाणे ते बदलते. तसेच रुग्णाच्या वयानुसारही त्याची गंभीरता वाढू शकते. त्यामुळे विंचवाच्या विषाच्या प्रमाणानुसार देण्यात येणारा प्रतिविषाचा डोसही जोपर्यंत रुग्ण पूर्णपणे बरा होत नाही तोपर्यंत वाढवला पाहिजे, असा निष्कर्ष आम्ही काढला होता.

सर्पदंशाच्या प्रतिविषाप्रमाणे या प्रतिविषाची रिअॅक्शन येईल का? अशी भीती अनेक वैद्यकीय व्यावसायिकांना वाटत होती असे सांगून डॉ. नातू म्हणाले, विंचूदंशाच्या बाबतीत एक महत्वाची गोष्ट माझ्या लक्षात आल्यामुळे या प्रतिविषावर निर्धोक असा शिक्का बसला. प्रतिविषावर रिअॅक्शन आली, तर अॅड्रिनॅलिन नावाचे इंजेक्शन द्यावे लागते व रुग्णाला आराम मिळतो. इथे तर विंचू चावल्यामुळे रुग्णाच्या शरीरात हे अॅड्रिनॅलिन मोठ्या प्रमाणात सतत तयार होते व त्यामुळे प्रतिविषाची रिअॅक्शन येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तौलनिक अभ्यासामध्ये एकालाही रिअॅक्शन आलेली नाही.

डॉ. तात्यासाहेब नातू यांचे स्वप्न साकार
कै. डॉ. तात्यासाहेब तथा श्रीधर नातू यांनी १९८० ते १९९२ या दरम्यान, वेळोवेळी विधानसभेमध्ये आवाज उठवून विंचूदंशासाठी प्रतिविष तयार करण्यासाठी संकल्पना मांडली होती व ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले होते. डॉ. शिरोडकर व कै. डॉ. काणकोणकर यांची भूमिका यात महत्त्वाची होती. माजी आमदार डॉ. विनय नातू, महाराष्ट्राचे तत्कालीन आरोग्यमंत्री डॉ. दौलतराव अहेर व तत्कालीन केंद्रीय आरोग्यमंत्री बॅ. ए. आर. अंतुले यांनी एफडीएकडून परवानगी मिळवण्यासाठी प्रयत्न केले होते, अशी माहिती डॉ. विवेक नातू यांनी दिली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:53 AM 08/Oct/2025